नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या पाठपुराव्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून नेरूळ सेक्टर १६ मधील पदपथावर महापालिका प्रशासनाने शनिवार सकाळपासून ब्लिचिंग पावडर फवारण्यास सुरूवात केली आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८ या परिसरातील पदपथावर शेवाळ साचून पदपथ निसरडे झाले आहेत. त्या पदपथावरून चालताना स्थानिक रहीवाशी घसरून पडण्याची व त्यांना दुखापती होण्याची भीती प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून व्यक्त केली होती. या निवेदनाची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून आज सकाळपासून सेक्टर १६ मध्ये पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्यास सुरूवात केली आहे. यावेळी जनसेवक गणेश भगत, चंद्रकांत महाजन, अनंत कदम, सागर मोहिते, रवी भगत यांच्यासह महापालिकेचे स्वच्छता अधिकारी अजित तांडेल, सफाईचे ठेकेदार शत्रुघ्न मेहेर उपस्थित होते. प्रभागातील उर्वरित भागात पावसाचा अंदाज घेवून टप्याटप्याने ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात येणार असल्याचे स्वच्छता अधिकारी अजित तांडेल यांनी सांगितले.