संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
डोंबिवली : दोन दिवस
झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना अडचणीचा त्रास सहन
करावा लागत आहे. पालिकेने खड्ड्यांसाठी पुरेशा निधीची तजवीज केलेली असतानाही
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत
तातडीने खड्डे बुजवावेत अन्यथा नागरिकाच्या सहनशिलतेचा अंत झाल्यास खड्ड्यातील दगड
महापालिकेच्या दिशेने भिरकावण्यास वेळ लागणार नसल्याचा गंभीर इशारा भाजपा आमदार
रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.
दरवर्षीच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात
मुसळधार पाउस पडत असल्यामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर पडणारे खड्डे
प्रशासनाच्या परिचयाचे आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी उच्च प्रतीचे तंत्रज्ञान
उपलब्ध आहे. मास्टेक कार्पेट सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना
आणि पालिका अर्थसंकल्पात खड्ड्यासाठी कोट्यावधीची तरतूद करण्यात आलेली असताना
पावसाळ्यापूर्वीच निविदा काढून खड्डे का भरले जात नाहीत असा प्रश्न आमदार रवींद्र
चव्हाण यांनी विचारला आहे. यंदा शहरात पाउस खूप उशिरा सुरु झाला असतानाही शहरातील
रस्त्याची चाळण झाली असून याला कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे सुस्त प्रशासन आणि
बेदरकार वृत्ती जबाबदार आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे
काम अजूनही सुरु आहे. हा पूल ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला
केल्यास वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी होऊ शकेल. यामुळे संथ पद्धतीने चाललेल्या
कामाला गती दिली जावी.
खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात
सर्वाधिक आहे. यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड
धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालक
गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरिता महापालिका
प्रशासन दोषी आहेच पण दुर्दैव असे की झालेल्या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध
घेत नाही एवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झालेली आहे. यामुळेच
नागरिकाचा अंत पाहू नका असेही आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.