संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbaialive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : संततधार स्वरूपातील मुसळधार पावसामुळे पदपथावर शेवाळ साचून ते निसरडे झाल्याने प्रभाग ८२ व ८४ मध्ये महापालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी यासाठी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याची महापालिकेने दखल घेतली आहे. प्रभाग ८४ मध्ये महापालिका प्रशासनाने पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्यास सुरूवात केली असून पावसाचा अंदाज पाहून दोन्ही प्रभागातील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिका प्रभाग ८२ व ८४ मधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करणेबाबत जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदन सादर करत समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार स्वरूपातील मुसळधार पाऊसामुळे प्रभाग ८२ व ८४ मध्ये रस्त्याररस्त्यावर पाणी साचलेले पहावयास मिळालेले आहे. या दोन प्रभागामधील पदपथावर सततच्या पावसामुळे शेवाळ साचण्यास सुरूवात झालेली आहे. पदपथही निसरडे झाले आहेत. पदपथावरून चालताना लहान मुले व महिला घसरून पडण्याच्या दोन-चार घटनाही घडलेल्या आहेत. या पदपथावर पालिका प्रशासनाकडून तात्काळ ब्लिचिंग पावडरची फवारणी न झाल्यास पदपथावरून चालणाऱ्यांच्या शरीराला गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्र्रशासनाने प्र्रभाग ८२ व ८४ मधील अंर्तगत व बाह्य ठिकाणच्या रस्त्यालगतच्या पदपथांवर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याविषयी आपण संबंधितांना आदेश देण्याची मागणीही विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
समस्येचे गांभीर्य व विद्या भांडेकरांचा सततचा पाठपुरावा पाहून महापालिका प्रशासनाने प्रभाग ८४ मधील पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकण्यास सुरूवात केली आहे. विद्या भांडेकर स्वत: पालिका कर्मचाऱ्यांसमवेत उभ्या राहून ब्लिचिंग पावडर फवारणीचे काम करून घेत असल्याचे प्रभागातील रहीवाशांना जवळून पहावयास मिळाले.