संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये गेल्या काही दिवसापासून महापालिका प्रशासनाकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहीवाशी आजारी पडण्याची भीती व्यक्त करत तात्काळ दूषित पाण्याचा पुरवठा थांबविण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसापासून महापालिका प्रभाग ९६ मध्ये महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा हा चिंताजनक बनला आहे. पिण्याचे पाणी गढूळ व दूषित स्वरूपाचे येवू लागल्याने प्रभागातील रहीवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सततच्या पाऊसामुळे मोरबे धरणात कदाचित चिखलाचे अथवा गढूळ पाणी झाल्यानेही खराब पाणी येत असावे. त्यामुळे शुध्द पाणी न मिळाल्यास प्रभागातील रहीवाशी आजारी पडण्याची भीती आहे. एकतर आधीच प्रभागातील रहीवाशी गेल्या दीड वर्षापासून नजरकैदेचा अनुभव घेत घरातच बसून आला दिवस ढकलत आहे. दूषित पाण्यामुळे आजारांचा उद्रेक झाल्यास उपचारासाठी खर्च करण्याचीही सध्या कोणाची आर्थिक ऐपत नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, तात्काळ दूषित पाणीपुरवठा थांबवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याविषयी निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.