संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : महापालिका स्थापनेपासून येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचारी तसेच ठोक मानधनावरील काम करणारे कर्मचारी अशी बिरूदावली लावूनच ठेकेदाराच्या माध्यमातून काम करावे लागत आहे. या कामगारांच्या कायम सेवेसाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी इंटक या कामगार संघटनेच्या माध्यमातून महापालिका मुख्यालय ते मंत्रालय तसेच अधिवेशनातही पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावर काम करणाऱ्या ३९ कर्मचाऱ्यांची सेवा कायम होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे आता अन्य ४१ संवर्गातील ५०६ कर्मचाऱ्यांच्या तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या १३८ शिक्षक, १२४ बालवाडी मदतनीस, १२० बालवाडी शिक्षिका, ८५ माध्यमिक शिक्षक यांच्या कायम सेवेबाबतच्या आशा पल्ल्वित झाल्या आहेत.
महापालिका स्थापनेपासून येथील कर्मचाऱ्यांना ठोक मानधन अथवा कंत्राटी कामगार या बिरूदावलीखालीच प्रशासनात ठेकेदारांच्या अधिपत्याखाली काम करावे लागत आहे. कंत्राटी सेवेचे निर्मूलन करण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे निर्देश असताना महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यात येत आहे. कायम कामगारांच्या तुलनेत कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम झालेली असतानाही नवी मुंबईत मात्र वेगळचे चित्र होते. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई इंटकच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने कोठेतरी ‘अच्छे दिन’ येवू लागल्याचे चित्र पालिका वर्तुळात निर्माण झाले आहे.
ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची कायम सेवा व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत समान कामाला समान वेतन यासाठी गेल्या काही वर्षात नवी मुंबई इंटकने कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून आंदोलन निर्माण केले. कायम सेवा व समान कामाला समान वेतन यासाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालय ते मंत्रालयादरम्यान रवींद्र सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा ठेवला. अन्य आमदारांच्या माध्यमातून अधिवेशनातही यासाठी प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाला राज्य सरकारकडे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समान कामाला समान वेतन हा ठराव पाठवावा लागला. या ठरावांना महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी नवी मुंबईतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींसह मंत्रालयात तसेच विधानभवनातही त्या पक्षाच्या व कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या सतत भेटीगाठी घेवून निवेदने सादर करून ठरावांना मंजुरी मिळण्यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी प्रयत्न केले.
राज्य सरकारने रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्याची दखल घेत ३९ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश दिले. यामध्ये २१ समूह संघठक / समूह संघठीका , १ त्वचा रोग चिकिस्तक, १ अस्थि व्यंग तज्ञ, २ नाक, कान व घसा तज्ञ , १४ कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग यांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचे आभार मानताना या निर्णयाने आपले समाधान झाले नसून सर्व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम झाल्याशिवाय व कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन मिळाल्याशिवाय आपला पाठपुरावा कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे. ३९ कर्मचाऱ्यांची सेवा कायम झाल्याने आता अन्य कर्मचाऱ्यांमध्ये कायम सेवेविषयी आशावाद निर्माण झाल्याचे पालिका वर्तुळात पहावयास मिळत आहे.