मुंबई : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी ५५ वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. कृषी, सहकार, क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृह शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाहीत महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.