संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ८७ मधील नेरूळ
सेक्टर ८ व १० मधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये जावून जनजागृती अभियान
राबविण्याची लेखी मागणी माजी नगरसेवक व शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात कोरोनावर मात करण्यासाठी
महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या तर कोणा गृहनिर्माण
सोसायटीत कोरोनाचा रूग्ण आढळल्यास संबंधित गृहनिर्माण सोसायटीतील सर्वाचीच कोरोना
चाचणी करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती ही
खाडीकिनारी तसेच काही प्रमाणात खाडीअंर्तगत भागात भराव टाकून झालेली आहे.
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असते. नवी मुंबईकरांना दरवर्षी ताप, हिवताप,
मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा उद्रेक सहन करावा लागत
आहे. प्रभाग ८७ मध्ये डेंग्यूचे रूग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग ८७
मध्ये महापालिका प्रशासनाकडून त्वरीत विशेष अभियान राबविणे आवश्यक आहे. प्रभाग ८७
मधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत जावून घरटी पाहणी अभियान करण्यात यावे.
साथीच्या आजाराचे रूग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जनतेत मार्गदर्शनही
महापालिका प्रशासनाकडून करण्यात यावे. साचलेले पाणी, डास उत्पत्ती स्थाने याची
पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळून येतील त्या त्या संबंधित
गृहनिर्माण सोसायटीच्या रहीवाशांना व पदाधिकाऱ्यांना अवगत करून त्याचे गांभीर्य
महापालिका प्रशासनाने निदर्शनास आणून द्यावे. प्रभागात मलेरियासोबत डेंग्यूचाही
उद्रेक होवू लागल्याने लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने अभियान राबविण्याची मागणी
रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.