१५ ऑगस्टपूर्वीच बँक अवसायानात काढावीः कांतीलाल कडू
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
पनवेल : तिसऱ्यांदा निर्बंध लादून कर्नाळा बँकेला अवसायानात काढण्यास रिझर्व्ह बँक टाळाटाळ करीत आहे. तिसऱ्या निर्बंधांची मुदत येत्या १५ ऑगस्टला संपुष्टात येत असून बँकेचे पूनर्वसन होणे शक्य नसल्याने तातडीने अवसायानात काढून किमान ठेवीदारांना विमा कवचाचे पैसे परत मिळवून देण्यास रिझर्व्ह बँकेने पुढाकार घ्यावा, अशा आशयाचे स्मरणपत्र पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापकांना पाठविले आहे.
कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेकानंद पाटील यांनी संचालक, अधिकाऱ्यांशी संगनमत करून ५४३ कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या ऑडिट रिपोर्टमुळे समोर आले आहे. त्यानंतर पनवेल संघर्ष समितीने पाटील आणि त्यांच्या साथीदारांविरोधात शंख फुंकल्यानंतर सक्त संचनालयाच्या (ईडी) राज्य शाखेने मुख्य आरोपी विवेकानंद पाटील यांना अटक केली. सध्या ते तळोजे कारागृहाच्या विशेष सेलमध्ये आहेत.
दरम्यान, कर्नाळा बँक ठेवीदारांना पैसे परत मिळविण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने पहिल्या सत्रात सहकार, पोलिस अधिकारी, मंत्रीमहोदयांसोबत बैठका घेवून प्रकरणाला गती दिली. दुसऱ्या सत्रात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, केंद्रिय अर्थमंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आणि रिझर्व्ह बँकेला जाग आणून दिली. तिसऱ्या सत्रात ठेवीदारांच्या ठेवींना विमाचे कवच देताना सहकार आयुक्त अनिल कवडे आणि प्रशासक गोपाळ मावळे यांच्यासह प्रधान सचिव अरविंदकुमार यांच्यासोबत बैठका घेवून कर्नाळा बँकेकडून विम्याच्या हफ्त्यापोटी ३८ लाखाची रोकड इन्सुरन्स कंपनीला भरण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
मात्र, त्या हफ्त्याची मुदत येत्या सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने १५ ऑगस्टनंतर पुन्हा एक महिन्यासाठी जरी निर्बंधांची मुदत वाढ दिली, तर बॅकेला पुन्हा इन्शुरन्सचा हफ्ता भरण्याची नामुष्की सोसावी लागणार असल्याची जाणीव रिझर्व्ह बँकेला पाठविलेल्या स्मरणपत्रात कांतीलाल कडू यांनी करून दिली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, ठेवीदारांचा आता अंत न पाहता बँक अवसायानात काढावी. बँकेचे पूनर्वसन होणे आता शक्य नाही किंवा तिचे इतर बँकेत विलिनीकरण करण्याची शक्यता तर धुसर झाल्याने एकमेव पर्याय उरला असून तो म्हणजे बँक अवसायानात काढल्याशिवाय पर्याय उ़रला नसल्याचा दावा कडू यांनी केला आहे. त्यामुळे ठेवीदारांना काही दिवसात डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनकडून ठेवी परत मिळू शकतील.
00000000000000 सहकार उपनिबंधक झोपी गेले? दोषींच्या मालमत्तांवर टांच कधी आणणार?
ठाण्याचे उपजिल्हानिबंधक तथा कर्नाळा बँकेचे प्राधिकृत अधिकारी विशाल जाधववर यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मनमौजीने निर्णय देताना काही संचालकांच्या मालमत्तांवर बोजा टाकला आहे. परंतु, आतापर्यंत वसुलीची कारवाई शुन्यातून बाहेर पडली नसल्याने जाधववार यांचा सहकाराबाबत विशाल दृष्टीकोन अतिशय लघु असल्याचे याप्रकरणातून दिसून आला आहे. त्यामुळे दोषी संचालकांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची वसुली झाली नसल्याने सहकार खात्याच्या कार्यवाहीवर संशयाची सुई रोखली गेली आहे.