नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ येथील सेक्टर २,३,४ आणि ८ परिसरात मूषक नियत्रंण मोहीम राबविण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस सुरूच आहे. नवी मुंबई शहर हे खाडीच्या किनारी तसेच खाडीअंर्तगत भागात वसलेले शहर असल्याने पावसाळ्यात नवी मुंबईकरांना ताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात डासांची प्रजननक्षमता वाढीस लागते. सध्या कोरोना महामारीचे दिवस सुरू आहेत. कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रभागातील सानपाडा सेक्टर २,३,४ आणि ८ परिसरात उंदरांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी स्थानिक रहीवाशी आमच्या कार्यालयात येवून करू लागले आहेत. कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या कुरतडणे, सोसायटी आवारात उभ्या असणाऱ्या वाहनातील वायरी तोडणे यासह घरातील कपडे कुरतडणे असे प्रकार उंदरांकडून घडत असल्याचे रहीवाशी सांगत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात उंदरांमुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर समस्येचे गांभीर्य पाहता, मूषक नियत्रंण विभागातील संबंधितांना आठ दिवसातून एकदा प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे आदेश देण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.