संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती अर्ज स्विकारण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मुदतवाढ जाहिर करण्याची लेखी मागणी प्रभाग ९६च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येत असते. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे नवी मुंबईतील असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहीले होते. यंदा शिष्यवृत्तीसाठी महापालिका प्रशासनाने अर्ज वितरीत केले असून महापालिका प्रशासनासह माजी नगरसेवक- नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून ते अर्ज विद्यार्थी व पालकांपर्यत पोहोचले आहे. शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज सादर करण्याकरिता महापालिका प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२१ ही अंतिम तारीख दिलेली आहे. इतर काळ व सध्याचा कोरोना महामारीचा काळ यात फरक आहे. सध्या प्रत्येक जण कोरोना महामारीशी संघर्ष करत जगण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना पालकांना उत्त्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. अनेकांच्या कंपन्या बंद आहेत. कार्यालये बंद आहेत. इतकेच नाही अनेक भागात तर सेतू कार्यालयेही बंद आहेत. तसेच प्रत्येकाला कोरोना काळात तलाठी कार्यालयात जाणे शक्य होत नाही. त्यात कोरोनाची लागण कोणाला घरात झाल्यास त्या घरातील कोणालाही बाहेर निघणे शक्य होत नाही. उत्पन्नाचा दाखला काढून देणारी अनेक कार्यालयातील माणसेही अजून गावाला आहेत. कोरोना महामारीत शिष्यवृत्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यास होत असलेला विलंब पाहता महापालिका प्रशासनाने शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करण्यासाठी अजून किमान १५ दिवसांची (१५ सप्टेंबरपर्यत) मुदतवाढ देणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने शिष्यवृत्तीबाबत मुदतवाढ न दिल्यास अनेक पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहतील, पर्यायाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. पर्यायाने शिष्यवृत्ती देण्यामागील महापालिका प्रशासनाचा उदात्त हेतूही सफल होणार नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यास लागणारा विलंब गृहीत धरून शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.