नवी मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत
दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या लढ्याच्या
दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वपक्षीय
कृती समिती अंकित नवी मुंबई महानगपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने वाशी गाव येथे
‘मशाल मार्च’चे आयोजन करण्यात आले.
सिडकोतर्फे उभारण्यात येत असलेल्या आंतराष्ट्रीय विमानतळाला
प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्या
संघटना, संस्था, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींसह सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांची
आहे. सिडकोने संचालक मंडळाच्या बैठकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आंतराष्ट्रीय
विमानतळाला देण्याचा प्रस्ताव प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता मंजूर करून तो राज्य
शासनाकडे पाठविला आहे. ज्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या
आहेत.
सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने सिडको व राज्याच्या
मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती करून देखील राज्य सरकार सिडकोने घेतलेल्या निर्णयावर
ठाम असल्याने प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत मानवी साखळी व त्यानंतर सिडकोला
घेराव आंदोलन केले या घेराव आंदोलनाला प्रकल्पग्रस्त व अन्य समाज यांचा मिळालेल्या
उस्फुर्त प्रतिसादानंतर, १५ ऑगस्टपर्यंत सिडकोने आपला निर्णय बदलून दि. बा. पाटील यांचे
नाव विमानतळाला देण्याबाबत कार्यवाही सुरु केली नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम
बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता.
परंतु, सिडको आणि राज्य सरकार यांच्याकडून कोठेही हालचाल सुरु नसल्याने
१६ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलनाची जनजागृती व नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी
९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त वाशी गाव प्रेमनाथ पाटील चौक येथे ‘मशाल मार्च’ काढून
‘दडपशाही चले जाव’ चा नारा देत काम बंद आंदोलनाची जनजागृती करण्यात आली.
सदर मोर्चात महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत व युवा नेते निशांत भगत यांच्यासह
स्थानिक भूमिपुत्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.