प्रदेश काँग्रेसला नाना पटोले यांच्या रूपाने ऊर्जावान नेतृत्व मिळाले. त्यांनी पक्षाला आलेली मरगळ झटकून कामाला लावण्यात बर्यापैकी यश मिळवले. नाना पटोले यांच्यात काही उणिवा असतील पण पक्षाला चार पावले पुढे नेण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहेत यात संशय नाही. काँग्रेसमधील जुन्या संस्थानिक नेत्यांना अलीकडे नवा नेता किंवा नवे प्रयोग अजिबात पचत नाहीत, त्यासाठी कोणत्याही संघटनात्मक हालचालींना हे नेते फारसा प्रतिसाद देत नाहीत. जिथे बसले तिथूनच दरबारी राजकारण करणार्या या नेत्यांना नाना पटोले यांनी कामाला लावले हेच सध्या मोठे नवल आहे.
काँग्रेस पक्षाचा विचार जुन्या लोकांच्या मेंदूत अजून कायम आहे. तो एवढ्या वर्षात पुसला गेला नाही म्हणूनच एखाद्या मतदारसंघात काँग्रेसने कसाही उमेदवार उभा केला तरी चवथ्या क्रमांकाची मते लोक त्याच्या पदरात टाकतात असा आजवरचा अनुभव आहे. काही लोक त्याला काँग्रेस किंवा गांधी घराण्याची पुण्याई समजतात. ज्यांच्या डोक्यात ही पुण्याई जिवंत आहे ते मात्र सध्या कुठेच कार्यकर्त्यांच्या भूमिकेत दिसत नाहीत, ही पिढी आता केवळ मतदान करण्यापुरती उरली आहे. ही जुनी पिढी अजिबात घाबरत नाही. आम्ही मरेपर्यंत काँग्रेसचा पंजा सोडणार नाही, असे जेव्हा खेड्यातील काही म्हातारे बोलून दाखवतात तेव्हा लक्षात येते की हे सामान्य लोक आहेत, कुणाच्या घरांचे छप्पर गळके तर कुणी जीर्ण घरात, वाड्यात राहतो आहे पण इमान पक्के आहे.
काँग्रेसच्या नव्या पिढीने मात्र गणिताचे, व्यवहाराचे राजकारण सुरू केले आहे. त्यांचा विचार, धोरणांवर भरोसा दिसत नाही. कोणता नेता शहरात आला की त्याला चेहरा दाखविण्यासाठी गोळा व्हावे याचे गणित करून वागणारा आणि कार्यक्रमांना हजेरी लावणारा हा धोरणी कार्यकर्ता, पदाधिकारी गेल्या काही वर्षात पक्षात तयार व्हायला लागला आहे. काँग्रेसने 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी व्यर्थ न हो बलिदान हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा सूचना दिल्या. मात्र, हे उपक्रम राबवताना जेवढी गर्दी व्हायला हवी होती ती राज्यभर कुठेही दिसली नाही. अकोल्यात तर 25 लोकांच्या उपस्थितीत ही ज्योत हुतात्मा स्मारकापर्यंत कशी बशी नेण्याचा उपचार कार्यकर्त्यांना करावा लागला .
एवढ्या वर्षातही काँग्रेसला एखाद्या राष्ट्रीय उपक्रमाला 100 लोक गोळा करता येत नसतील तर सहा महिन्याने होणार्या पालिका निवडणुकांना हे लोक कोणत्या तोंडाने समोर जाणार आहेत? पक्षाची पदे घेऊन बसणारे काही लोक, लेटरपॅड वापरून आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना केवळ काम सांगण्यापुरते आता काँग्रेसचा, त्यांच्या पदांचा वापर करायला लागले आहेत. कार्यक्रम किंवा ज्याने खिश्याला कात्री लागेल अशापासून दूर पळणारे नेते आता पक्षाने ओळखले पाहिजेत, त्यांना खड्यासारखे दूर फेकले पाहिजे तरच येणारे दिवस चांगले आहेत.
लोक आपल्या कोणत्याही उपक्रमात का सहभागी होत नाहीत यावर पक्षाने चिंतन करण्याची गरज आहे.नियोजन चुकते की लोकांना काँग्रेसवर भरोसा राहिला नाही यापैकी काय खरे आहे याचा तपास करावा असे या पक्षातील कुण्यातरी नेत्याला वाटते का? तसे पाहिले तर या पक्षाकडे डझनावारी आघाड्या, सेल, बॅटर्या कार्यरत आहेत. समजा या सर्वांचे लेटरहेड जमा केले तर एखादा ट्रक भरेल मग लोक सोडा पदाधिकारी तरी का गोळा होत नाहीत हेसुद्धा कुणाला जाणून घ्यावेसे वाटत नसेल तर कठीण आहे काँग्रेससाठी पुढचा काळ.
- पुरुषोत्तम आवारे पाटील
दै.अजिंक्य भारत,अकोला