Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@ggmail.com
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या तुर्भे येथील शाळेमध्ये मुलाचा दाखला घेण्यासाठी गरीब महिलेकडून अवास्तव रकमेची जबरदस्ती मागणी करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची लेखी मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्र्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २ मधील आम्रपाली सोसायटीतील रहीवाशी जयश्री बाळाराम बागडे यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने रवींद्र सावंत यांनी निवेदनातून असून त्याविषयीच्या समस्येचे गांभीर्य आणि मनपा शाळेत पालकांची होणारी लूट पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
जयश्री बागडे यांचा मुलगा कु. मुकुंद बाळासाहेब बागडे याला १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीची परिक्षा देता यावी यासाठी जानेवारी २०२१ मध्ये त्या तुर्भे गाव येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे माध्यमिक शाळा क्रं १०७ भोलानाथ पाटील शाळेत गेल्या, त्या ठिकाणी त्यांना कुसराम सर हे भेटले. त्यांनी त्यांच्याकडून शालेय प्रवेश फी ११०० रूपये, हॉल तिकीटचे १००० रूपये आणि फॉर्म जमा करून घेण्याचे ४५० रूपये घेतले. त्यानंतर आता ९ ऑगस्ट २०२१ रोजी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी त्यांचा मुलगा कु. मुकुंद बाळासाहेब बागडे सकाळी शाळेत गेला असता त्याच्याकडून ५०० रूपये दाखला फी आणि वरच्या साहेबांना देण्यासाठी १००० रूपये अशी एकूण १५०० रूपये देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मुख्याध्यापक स्वत: मुकुंदला म्हणाले की, ५०० दाखला फी आणि १००० रूपये मी माझ्या खिशातून भरले आहेत. उद्या आईला घेवून शाळेत पैसे जमा करण्यासाठी ये, असा प्रकार घडल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनातून पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
जयश्री बागडे या नेरूळ सेक्टर २ येथील त्या घरकाम करून परिवाराची उपजिविका भागवित आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांचे घरकामही कमी झाले असून वेतनही कमी झाले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची व दयनीय आहे. अशा परिस्थितीत त्या वरच्या साहेबाला देण्यासाठी मुख्याध्यापक सर ज्या १००० रूपयांची मागणी करत आहे. ते पैसे त्या कोठून देणार? आधीच त्या शेजारच्या लोकांकडून तसेच नातेवाईकांकडून उधारउसनवार करून संसार चालवित आहे. त्यांची परिस्थिती समजावून घेवून संबंधितांना न्याय मिळवून देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
मुळातच महापालिका शाळेत शिक्षण घेण्यासाठी हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या गरीब व गरजू घरातीलच मुले येत असतात. मनपा शाळेमध्ये कोणीही सधन अथवा मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी शिक्षण घेण्यासाठी येत नाही. कोरोना महामारीच्या काळात श्रीमंत तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली असून गरीब तर आणखीनच भिकेला लागला आहे. मनपा शाळेतील शिक्षण मोफत असताना वरच्या साहेबाला देण्यासाठी गरीब व परिस्थितीने त्रस्त झालेल्या पालकांकडे पैसे मागणी करणे कितपत योग्य आहे? ही पालिका शाळा आहे का महापालिकेच्या छताखाली लुटमार करणाऱ्यांचे आश्रयस्थान अशी चर्चा सुरू आहे. ही संतापजनक बाब आहे. संबंधितांनी रवींद्र सावंत यांच्याकडे तक्रार केल्यामुळे ही घटना उजेडात आली आहे. आजवर किती गरीब पालकांची अशा स्वरूपात लुटमार झाली असेल व किती पैशांना संबंधितांना लुटले असेल याचा हिशोब लावणेही अवघड आहे. घडलेला प्रकार निंदनीय असून संबंधितांचा गुन्हाही अक्षम्य स्वरूपाचा पालिकेच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. आयुक्तांनी स्वत: या प्रकरणाचे गांभीर्य जाणून चौकशी करावी व संबंधितांवर प्रशासकीय कारवाई तसेच गुन्हाही दाखल करावा. महापालिकेने या प्रकाराकडे कानाडोळा करत संबंधितांला खतपाणी घातल्यास नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने शाळेत जावून संबंधित शिक्षकाला काळे फासले जाईल. महापालिका शाळेची पर्यायाने नवी मुंबई महापालिका शिक्षणाची प्रतिमा मलीन होवू नये यासाठी रवींद्र सावंत यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांकडून न्यायास विलंब झाल्यास काँग्रेस आंदोलन करेल व पालकांचा उद्रेक झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा रवींद्र सावंत यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
रवींद्र सावंत यांनी निवेदनातून दाखल्यासाठी पालिका शाळेचे मुख्याध्यापक स्वत: हजार रूपयांची मागणी करत असल्याने महापालिकेच्या शैक्षणिक वर्तुळातील सावळागोंधळ व गलथान कारभार उजेडात आला आहे.