नवी मुंबई : कोकणासह इतर भागात अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या आकस्मिक संकटात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने तत्परतेने मदतीचा हात पुढे करीत आवश्यक यंत्रसामुग्री, वाहने, जंतुनाशके, औषधे यासह महाड, चिपळूण, कोल्हापूर भागात मदतकार्य पथके व वैद्यकीय पथके रवाना केली होती. तेथील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी या पथकांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याची दखल तेथील सर्वसामान्य नागरिकांनी घेतलीच शिवाय शासकीय पातळीवरून तसेच लोकप्रतिनिधींकडूनही या पथकांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. चिपळूणमधील स्थानिक प्रशासनामार्फत मदतकार्य पथके पाठविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे याविषयीचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याकडे प्राप्त झाली. त्यास महापालिका आयुक्तांची त्वरित मान्यता लाभली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार 2 व 3 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची 206 स्वयंसेवकांची दोन जम्बो मदतकार्य पथके प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली चिपळूणकडे रवाना झाली होती. त्यामध्ये सह स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन, स्वच्छता निरीक्षक श्री.मिलींद तांडेल, श्री.महेश महाडिक, श्री. मनिष सरकटे, श्री. संजय शेकडे, श्री. अरूण पाटील, श्री. भूषण सुतार, श्री. विजय चौधरी, सहा. अग्निशमन अधिकारी श्री. रोहन कोकाटे, अग्निशमन प्रणेता श्री. शैलेश जगताप, श्री. श्रीकांत सावंत यांच्यासह 206 स्वयंसेवक सहभागी होते. या पथकांसोबत 2 फायर टेंडर व 6 बसेस आणि 3 जीप आवश्यक उपकरणे, जंतुनाशके यांच्यासह पाठविण्यात आलेल्या होत्या. पूर ओसरल्यानंतरच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, चिखलाचे साम्राज्य, कच-याचे ढीग आणि कोलमडलेल्या नागरी सुविधा अशा अतिशय बिकट परिस्थितीत या पथकांकडे नेमून दिलेल्या 11 प्रभागांमधील स्वच्छतेचे काम या स्वयंसेवकांनी केलेच त्यासोबत तेथील स्थानिकांना धीर देत मानसिक उभारी देण्याचे कामही केले. स्वच्छता केल्यानंतर त्याठिकाणी जंतुनाशकाची फवारणीही करण्यात आली. या समर्पित भावनेने केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईसह ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्याचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांचा मदतकार्य पथकांचे नियंत्रक म्हणून मंत्रीमहोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. इतरांच्या अडचणीच्या काळात मानवतेच्या दृष्टीने मदतीसाठी धावून जाणारी महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिकेची वेगळी ओळख या पूरपरिस्थितीमधील महाड, चिपळूण, कोल्हापूर भागीतील अथक मदतकार्याने पुन्हा अधोरेखीत झालेली आहे.