सुरेंद्र सरोज : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ परिसरात व सारसोळे गावात गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून यामुळे ग्रामस्थ व रहीवाशी त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात विकतचे पाणी आणून मोरबे धरण तयार करण्याचा तसेच यातून काही समस्या निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा लेखी इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना एका निवेदनातून दिला आहे.
गेल्या काही महिन्यापासून नेरूळ सेक्टर ६ परिसरात व सारसोळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आणि रहीवाशी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक वेळी लेखी तक्रार केल्यावर तसेच आंदोलनाचा इशारा दिल्यावर पाणीपुरवठा तीन-चार दिवस व्यवस्थित होतो व नंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे. घरात पाण्याची अडचण वादाचा मुद्दा बनत आहे. एकीकडे मोरबेसारखे स्वतंत्र धरण आणि २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची पालिका प्रशासनासह राजकारण्यांकडून केली जाणारी सातत्याने घोषणाबाजी आणि दुसरीकडे सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर ६ च्या रहीवाशांना सातत्याने करावा लागणारा पाणीटंचाईचा सामना हा विरोधाभास संतापजनक बाब आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही ग्रामस्थ तसेच रहीवाशांसमवेत नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात विकतचे पाणी आणून मोरबे धरणाची प्रतिकृती निर्माण करू. सततच्या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांसह रहीवाशांच्या संयम व सहनशीलतेचा अंत झाल्याने यातून काही समस्या निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.