सुरेंद्र सरोज : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याची अडवणूक करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज वितरीत करण्यास सुरूवात केली आहे. तथापि कोरोना महामारीचा काळ असल्याने शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रांची जमवाजमव करताना विशेषत: उत्पन्नाचा दाखला मिळविताना अडचण होत असल्याने शिष्यवृत्ती अर्ज जमा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. त्यातच शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करताना संबंधित शाळेचा सही व शिक्का आवश्यक आहे. कोरोना महामारीमुळे असंख्य शाळांमध्ये फी, अतिरिक्त फी, डोनेशन, एक्स्ट्रा फी अशा विविध विषयावरून शालेय व्यवस्थापन व पालक वर्गामध्ये वाद सुरू आहेत. कोरोना महामारीत नोकऱ्या गेल्याने, वेतनात कपात झाल्याने तसेच शाळा बंद असल्याने ट्यूशन फीचा अपवाद वगळता अन्य फी भरण्यास पालकांचा व विद्यार्थी संघटनांचा विरोध आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी शाळेचा आवश्यक असणारा शिक्का व सही देण्यास शाळांनी विरोध केल्याने पालकांना शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी शाळांनी सहकार्य करण्याबाबत पालिका प्रशासनाने प्रसिध्दीपत्रक प्रकाशित करून शाळांनाही निर्देश दिले आहेत. या निर्देशाला शाळांकडून केराची टोपली दाखविण्यात आली असून सहकार्य न करता शाळांनी आपली ताठर भूमिका कायम ठेवली आहे. फी भरल्याशिवाय शिक्का व सही देणार नसल्याची आडमुठी भूमिका शालेय व्यवस्थापणाने घेतलेली आहे. फीबाबत पालक व शालेय व्यवस्थापणात तोडगा निघेल तेव्हा निघेल, तथापि शिष्यवृत्तीसाठी सही व शिक्का देण्यास शाळांनी आडकाठी करू नये. उद्या तोडगा निघाला तरी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यास मुदत टळून गेल्यास काही फायदा नाही. मुले शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील. त्यामुळे मुलांना शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यास आडकाठी करणाऱ्या शाळांवर कठोरात कठोर कारवाई तात्काळ करण्याची मागणी निखील मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.