नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांचे शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. समस्यांचा पाढा वाचत कर्मचाऱ्यांच्या व्यथा रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. आयुक्तांनी रवींद्र सावंत यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यासमसवेत चर्चेत सहभागी झालेल्या शिष्टमंडळाला दिले.
शुक्रवारी सांयकाळी पालिका मुख्यालयात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आस्थापनेतील विविध कामगारांना घेवून पालिका आयुक्तांची भेट घेत कामगारांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या शिष्टमंडळात रवींद्र सावंत, वाहनचालक युनिट अध्यक्ष राजन सुतार, वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयातील सुहास म्हात्रे, युनिट अध्यक्ष बेरे, सी. पुत्रन, घनकचरा विभागातील मिलिंद आंबेकर व विजय नाईक. प्रल्हाद गायकवाड, मंगेश गायकवाड आदी सहभागी झाले होते.
वाहन विभागातील चालकांच्या समस्येबाबत शिष्टमंडळातील राजन सुतार यांनी वाहनचालकांच्या समस्येचा मुद्दा मांडत आयुक्तांपुढे समस्या सादर केल्या. वाहन विभागातील चालकांकडून अपघात झाल्यास प्रशासनाच्या विधी विभागाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. चालकाला धावपळ करावी लागते. चुकून अपघात झाल्यास विधी विभागाकडून सहकार्य मिळण्याचा मुद्दा सुतार यांनी आयुक्तांशी चर्चेदरम्यान मांडला. रवींद्र सावंत यांनीही चालकांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत यावेळी चर्चेदरम्यान व्यक्त केली.
वाहन विभागातील रूग्णवाहिका चालविणाऱ्या चालकाला मदतनीस नसल्याने त्याला होत असलेल्या त्रासाबाबत रवींद्र सावंत यांनी आयुक्तांसमोर पाढा वाचला. रूग्णवाहिकेच्या चालकाला रूग्ण घेवून जाणे, स्ट्रेचरसाठी धावपळ करणे, रूग्णाला उपचार उपलब्ध करून देणे अशी कामे एकट्यालाच करावी लागतात. रूग्णवाहिका चालकाला मदतनीस उपलब्ध करून दिल्यास चालकांचा त्रास कमी होईल. सध्या चालकाला वाहन चालविणे व रूग्णाचीही काळजी घेणे अशा दुहेरी भूमिका साकाराव्या लागत असल्याने लवकरात लवकर मदतनीस उपलब्ध करून देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली.
वाहन विभागातील चालकांना बढती देताना प्रशासनाने दहावी, दहावी आयटीआय आदीचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा. चालकांची रूग्णालयीन वैद्यकीय बील लवकर मंजुर होत असल्याने त्यांची आर्थिक ससेहोलपट होत आहे. तसेच बील मंजुर करावे यासाठी पालिका प्रशासनात धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे संबंधितांची वैद्यकीय बिले लवकरात लवकर मंजुर करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी यावेळी केली.
कोपरखैराणे सेक्टर ११, भुखंड क्रं १४, भुखंडाचे क्षेत्रफळ ४९९७.८२ चौ. मी या भुखंडावर मनपा कामगारांसाठी निवासी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी यावेळी केली. या मागणीसाठी रवींद्र सावंत मागील काही काळापासून प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत आहे. या भुखंडावर कोणी अतिक्रमण केल्यास भुखंड खाली करवून घेणे व अतिक्रमण काढणे अवघड जाणार असल्याची भीती रवींद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.
महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात चतुर्थ श्रेणी कामगार वर्गाचा तुटवडा असल्याचे सुहास म्हात्रे यांनी चर्चेदरम्यान पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आया, वॉर्ड बॉय यांची लवकरात लवकर भरती करण्यात यावी. सध्या रूग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
प्रसुती कक्ष, शस्त्रक्रिया विभागात स्त्री नाभिक उपलब्ध करून द्यावेत. कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका अद्ययावत करावी. अनुकंपातत्वावर कक्षसेवक, कक्षसेविका भरती करावी.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांचा प्रशासकीय सेवेत समावेश करावे. सणासमारंभाना फेस्टीवल अलाऊंन्स २५ हजारापर्यत देण्यात यावा. वाशी पालिका रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांकरिता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण अभियान राबवावे याही मागण्यांचा बैठकीदरम्यान ऊहापोह करण्यात आला.
कंत्राटी कामगार म्हणून नव्याने चालक भरती करण्यात आला असून त्यांना जेमतेम १२ हजार वेतन दिले जात आहे. महागाईच्या काळात या नव्याने भरती झालेल्या चालकांचे आर्थिक शोषण होत असून त्यांना योग्य ते वेतन देण्यात यावे. ठोक मानधनावरील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाचा कायम सेवेबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे महापालिका प्रशासनाने पाठवावा. यापूर्वी शिक्षण मंत्र्यांकडे तो पाठविण्यात आलेला आहे. तो सुधारीत प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली.
वैद्यकीय अधिकारी/ अपघात वैद्यकीय अधिकारी यांना आश्वासित प्रगती योजना लागू होण्यासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या अर्हतेत बदल करून शासनस्तरावर मंजुरीसाठी प्रशासनाने पाठवावा. ठाणे जिल्हा परिषदेतून नवी मुंबई महानगरपालिकेत वर्ग झालेल्या बालवाडी शिशिकांना न्याय मिळवून द्यावा. १५ बालवाडी शिशिका वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. माळी संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. तसेच हेड माळी या स्वरूपात त्यांनाही बढती देण्याबाबत पालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, ठेकेदारामार्फत प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन लागू करण्याची यावे. यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचाही संदर्भ देण्यात आला. कर्मचारी संख्याबळ निश्चित करून त्यात कुशल-अकुशल असे वर्गीकरण करून या सर्वच कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. लेडी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी शैशणिक अर्हता एसएससी. एएनएम/ एचएससी,एएनएम व १०० टक्के पदोन्नतीसाठी राखीव असा बदल करण्यात यावा. पावसाळी साहीत्याबाबत महिला व पुरूष असा फरक नसावा. पुरूष व महिला कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताना कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका आस्थापनेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडताना समस्या सादर केल्या.
कामगारांच्या समस्या जाणून घेतल्यावर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना लवकरात लवकर समस्या सोडविण्याचे आश्वासन कामगारांना दिले.