संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.coom – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे पदपथावर शेवाळ साचल्याने रहीवाशी, महिला, विशेषत: ज्येष्ठ नागरिक घसरून पडण्याच्या, जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मधील भाजपाचे युवा नेते – समाजसेवक पांडुरंग आमले यांनी शेवाळलेले पदपथ व चालताना घसरून जखमी होणारे पादचारी हे पाहून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे वारंवार लेखी निवेदनातून पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची मागणी केली. तथापि महापालिका प्रशासनाचा समस्येकडे होत असलेला कानाडोळा पाहिल्यावर भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी स्वत: पुढाकार घेवून पदपथावर व गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात ब्लचिंग पावडर फवारण्यास सुरूवात केली आहे.
सानपाडा नोडमध्ये आषाढी वारीमुळे तसेच कोरोना काळापासून सातत्याने विविध जनहितैषी लोककल्याणकारी उपक्रमामुळे भाजपाचे पांडुरंग आमले नवी मुंबईमध्ये चर्चेच्या प्रकाशझोतात आले आहे. आषाढी वारीचे आयोजन व त्यातून पांडुरंग आमलेंना अडचणीत आणण्याचे षडयंत्र उघडकीस आल्याने सानपाडावासियांमध्ये पांडुरंग आमले यांची लोकप्रियता आणखीनच वाढीला लागली आहे. कोरोना महामारीत घराजवळच वारी घडवून पांडुरंगाच्या दर्शनाच्या लाभाची अनुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पांडुरंगाला झालेला त्रास पाहून सानपाडातील भाविकांमध्ये हळहळही व्यक्त केली जात आहे.
मुसळधार पाऊसामुळे प्रभाग ७६ मधील पदपथावर शेवाळ साचल्याने व त्यातून घसरून पडण्याच्या दुर्घटना घडू लागल्याने महापालिका प्रशासनाने प्रभागातील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी यासाठी भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी २९ जुन, १ जुलै, १९ जुलै व ४ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदन देताना समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्नही केला. तथापि प्रशासनाकडून काहीही कार्यवाही होत नसल्याचे पांडुरंग आमले यांनी स्वत: पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आणि स्वखर्चाने प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पदपथावर स्वत:च्या हातून तसेच कार्यकर्त्यांच्या व मित्रांच्या माध्यमातून ब्लिचिंग पावडर फवारण्याच्या उपक्रमास पांडुरंग आमले यांनी सुरूवात केली आहे. जे पालिका प्रशासनाला जमले नाही ते आमच्या पांडुरंग आमलेंनी करून दाखविले असा सूर आता सानपाडावासियांकडून चर्चेदरम्यान उघडपणे आळविला जावू लागला आहे.
पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारणी करण्यास पालिकेकडून होत असलेली चालढकल पाहिल्यावर पांडुरंग आमले यांनी बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग ७६ मध्ये स्वखर्चाने ब्लिचिंग पावडरची फवारणी पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात करण्यास सुरूवात केली आहे. या ब्लिचिंग पावडर फवारणीचा शुभारंभ आदर्श स्वस्तिक नर्मदा संकल्प व कोहिनूर सोसायटी व लगत असणाऱ्या पदपथावर करण्यात आला. टप्याटप्याने सर्व प्रभागामध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करणार असल्याचे पांडुरंग आमले यांनी यावेळी सांगितले. पांडुरंग आमले यांच्यासमवेत निलेश वर्पे, पंकज दळवी, विश्वास कणसे, नाना शिंदे, विनायक काबुगडे, शुभम आमले, सिद्धेश आमले, अथर्व आमले, रमेश शेटे यांनीही ब्लिचिंग पावडर फवारणी करण्यासाठी परिश्रम घेतले.