राज ठाकरेंच्या भूमिकेकडे नवी मुंबईकरांचे लक्ष
संदीप खांडगेपाटील : 8369924646 – 9820096573
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांमध्ये घट येवू लागल्याने व लसीकरणाचे प्रमाण वाढीस लागल्याने नवी मुंबईतील राजकारण्यांमध्ये निवडणूकांचे वेध वाढीस लागले आहे. त्यातच नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी सौ. संजीवनी काळे यांनी कौंटूबिक कलहातून पोलीस दफ्तरी दाखल केलेल्या तक्रारीमुळे मनसेची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलीन होत चालली आहे. त्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे फरार झाल्यामुळे आता मनसेसुप्रिमो राज ठाकरे नवी मुंबईतील मनसेप्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.
गेल्या काही दिवसापासून कोरोना महामारी असतानाही नवी मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गजानन काळे व त्यांच्या पत्नीमधील वाद हा घराच्या चौकटीबाहेर तसेच पोलीस ठाण्याच्याही बाहेर जावून राजकीय वर्तुळात गेल्याने नवी मुंबईतील घडामोडी आता राज्यातील राजकारणातही चर्चेचा विषय बनल्या आहेत. सौ. संजीवनी काळे यांनी पोलीस ठाण्यात कौंटूबिक हिंसाचार,जातीवाचक शब्दप्रयोग, उत्पन्नाचे स्त्रोत, मालमत्ता, मनपा अधिकाऱ्यांचे आर्थिक सहकार्य यासह काळे यांच्याही सहकाऱ्यांचा नामोल्लेख करणे आदी घडामोडींचा प्रसिध्दी माध्यमांसमोरही उल्लेख केल्याने नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सौ. संजीवनी काळे या महिला असून अन्याय, अत्याचाराचा कडेलोट झाल्यामुळेच त्या स्वत:च्या पतीविरोधात आवाज उठवित असल्याची सहानुभूतीही त्यांना आता महिला वर्गाकडून मिळू लागली. जोपर्यत गजानन काळे समोर येवून सत्यता कथन करत नाही, तोपर्यत नाण्याची दुसरी बाजू समजणे अवघड असल्याची समजंस भूमिका काही घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्र्रेस व शिवसेनेच्या महिला रणरागिनीकडून सौ. संजीवनी काळे यांना साथ देत सहानभूतीही व्यक्त केली जात आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील काल नवी मुंबईत आले असता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या रणरागिनीकडून गजानन काळेेंच्या अटकेची मागणी करण्यात आली. गजानन काळे अजून पोलिसांना सापडले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
महिलेवर झालेले कौंटूबिक अत्याचार व त्या अनुषंगाने अन्य आरोप, जातीवाचक शब्दप्रयोग, उत्पन्नाचे स्त्रोत, मालमत्ता, मनपा अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधातून येणे-जाणे या आरोपांमुळे गजानन काळेंच्या कौंटूबिक वादात मनसेची नवी मुंबईत प्रतिमा मलीन झालेली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या तोंडावरच हे प्रकरण घडल्याने मनसे कमालीची ‘बॅकफूट’वर गेल्याचे जनसामान्यातील चर्चेदरम्यान पहावयास मिळत आहे. गजानन काळे स्वत: समोर आल्यावर अथवा पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्या जबाबातून नाण्याची दुसरी बाजू समजण्यास मदत होणार असली तरी याप्रकरणी मनसेसुप्रीमो राज ठाकरे काय भूमिका घेणार याबाबतही उलटसूलट चर्चा होवू लागली आहे. मनसे लवकरच व्यापक हिंदूत्वाच्या भूमिकेचा स्विकार करण्याची शक्यता असल्याने एका अमराठी घटकाला विशेषत: उत्तर भारतीय व्यक्तित्त्वाला नवी मुंबई मनसेची धुरा सोपविली जाणार असल्याचीही चावडी चर्चा गेल्या दोन दिवसापासून जोर धरू लागली आहे. महिला आंदोलकांनी तसेच प्रसिध्दी माध्यमांनीही सौ. संजीवनी काळे यांची जोरदार पाठराखण केल्याने गजानन काळे यांच्या कार्याला जोरदार ‘ग्रहण’ लागल्याचे दिसून येत आहे.