नवी मुंबई : कौंटूनिक कलहामुळे आधीच अडचणीत असलेले गजानन काळे यांना लवकरच न्यायालयीन प्रकरणातून मुक्त होईपर्यत नवी मुंबई शहर अध्यक्ष पदावरून मुक्त केले जाणार असल्याची माहिती मनसेतील खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात येत आहे.
गजानन काळे व त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी काळे या पती-पत्नीच्या कौंटूबिक कलहामध्ये राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी उडी घेतल्याने या वादाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. गजानन काळे हे गुन्हा दाखल झाल्यापासून सात दिवस फरारी असल्याने व त्यांना शोधण्यात नेरूळ पोलिसांना अपयश आल्याने विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनाही आता या प्रकरणात लक्ष घालावे लागले आहे.
गजानन काळेंचे उत्पन्न, पालिका अधिकाऱ्यांकडून घरपोच येणाऱ्या आर्थिक भेटी,जातीवाचक शब्दप्रयोग, कौंटूबिक हिंसाचार यासह फरार होणे आदी कारणांमुळे नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात सध्या गजानन काळे हा एकमेव विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. सौ. संजीवनी काळे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडून घरपोच मिळणाऱ्या आर्थिक भेटी व त्याची आकडेवारी आरोपामध्ये जाहिर केल्याने आरटीआय कार्यकर्ते व मातब्बर राजकारणी यांचेही डोळे फिरले असून हे मघबाडफ आपल्याकडे वळविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आता विविध त्रासाचा कायदेशीर सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आता कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा सामना करणे प्रचारादरम्यान मनसेला अवघड जाणार आहे. त्यातच गजानन काळे फरार असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजू अद्यापि प्रकाशझोतात येणे बाकी आहे. गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणूका लढणे मनसेला परवडणारे नसणारे तसेच महिला मतदारांची नाराजी ओढवून घेणारे असल्याने तुर्तास मनपा निवडणूकापुरते तरी गजानन काळेंना पदमुक्त करण्याची मागणी मनसेच्या वर्तुळात जोर धरू लागली आहे. त्यातच जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचाही आरोप झाल्याने आंबेडकरी समाजाचे मतदान मनसेला मिळणे अवघड असल्याची भीती मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जावू लागली अहो. पालिका निवडणूकांचे पडघम सुरू होण्यापूर्वी गजानन काळेंना पदमुक्त करण्यात येणार असल्याचे मनसेमधील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये आंदोलनाची, निदर्शनाची नव्याने ओळख करून देणाऱ्या गजानन काळे नेतृत्वाची अल्पावधीत वाताहत व्हावी व आरोपांच्या माध्यमातून एक वेगळाच चेहरा प्रकाशझोतात यावा याचीही हळहळ नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे. गजानन काळेला येवू द्या, त्याला त्याची बाजू मांडू द्या, आपण न्यायनिवाडा करायला न्यायाधीश नाही, तो खरे काय ते त्याच्या पध्दतीने सांगेल, तोपर्यत शांत राहा, विषय वाढवू नका, नवरा-बायकोमधील वाद आहे, त्याला राजकीय रंग लावू नका असाही सूर नवी मुंबईतील काही घटकांकडून व्यक्त केला जात आहे.