संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई / पनवेल : मागील महिन्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात हानी झालेल्या महाड, चिपळूण, कोल्हापुर भागात नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या तसेच वैद्यकीय पथकांनी केलेल्या कार्याची एमआयएमच्या विद्यार्थी आघाडीकडून प्रशंसा केली असून विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कोकणला व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाला बसला. वरूण राजाच्या प्रकोपामुळे न भरून येणारे नुकसान झाले. प्रचंड वित्तहानी झाले, शेतीच्या पिकांसह शेतांचे नुकसान झाले. घराघरांमध्ये माती, चिखलाचा गाळ घुसून घरांचे नुकसान झाले, असंख्य घरांची पडझड झाली. या काळात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अतिवृष्टीग्रस्त भागातील लोकांसाठी केलेले कार्य खरोखरीच प्रशंसनीय व उल्लेखनीय आहे. आपण महापालिकेची सफाई कामगारांची पथके स्वच्छतेसाठी व वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची पथके तात्काळ महाड, चिपळूण, कोल्हापुर भागासाठी पाठवून दिलीत. सफाई कामगारांनी आपली दिलेली कामगिरी चोख बजावली व सफाई करत स्वच्छता निर्माण केली. वैद्यकीय पथकांनी आजारी लोकांची सेवा केली. राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असताना महाराष्ट्र राज्याला गरज असताना अतिवृष्टीग्रस्तांना वास्तव स्वरूपात महाड, चिपळूण आणि कोल्हापुर भागाला नवी मुंबई महापालिकेने मदतीचा हात दिला. याबाबत एमआयएमच्या वतीने आम्ही या लेखी निवेदनातून आपले जाहीर आभार मानत आहोत व आपल्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याबाबत आपले अभिनंदन करत आहोत. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट येईल, त्या त्या वेळी नवी मुंबई महानगरपालिका याच स्वरूपात सेवाभावी वृत्तीने महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून जाईल, अशी अपेक्षा एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनाच्या अखेरीस व्यक्त केली आहे.