सध्या नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात गजानन काळे हाच एकमेव विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. गजानन काळे हा नवी मुंबईत काही वर्षापूर्वी आलेला एक अवलिया. मनसे स्थापनेनंतर ज्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यासह प्रवेश केला अथवा ज्यांच्या मनसे प्रवेशाची प्रसिध्दी माध्यमांनी दखल घेतली, यातीलच एक प्रस्थ म्हणजे गजानन काळे. विद्यार्थी चळवळीतील एक लढवय्या नेतृत्व व विविध आंदोलनातून तावून सुलाखून निघालेले युवा नेतृत्व, विद्यार्थी नेता. आंदोलनातून संघटनेला नावारूपाला आणणारा, जनसामान्यांमध्ये चर्चेत ठेवणारा अशा विविध रूपात गजानन काळेला नवी मुंबईकरांनी पाहिला आहे. नागरी समस्यांसाठी प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी विविध नावाखाली विभाग कार्यालय ते महापालिका मुख्यालय गजानन काळेंनी आंदोलनेही केली आहेत. नवी मुंबईतील मुजोर शिक्षण सम्राटांनाही गजानन काळेंनी वठणीवर आणले होते. जनआंदोलने, निदर्शने यामुळे गजानन काळेंनी प्रसिध्दी माध्यमांमध्ये स्वत:चे पर्यायाने मनसेचे नाव चर्चेत ठेवले होते. पण मनसेकडे जनाधार वळविण्यात गजानन काळेच्या नेतृत्वाला अपयश आले. मागील विधानसभा निवडणूकीत गजानन काळेला मिळालेल्या मतामध्ये मनसेचा वाटा किती व शिवसैनिकांचा छुप्पा वाटा किती हाही संशोधनाचा भाग आहे. त्याअगोदरच्या विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मिळूनही मनसेला दहा हजाराचा आकडा ओंलाडता आलेला नव्हता. जनाधार नसला तरी गजानन काळे हे सातत्याने चर्चेत राहीलेले नाव होते. वलय असलेले नेतृत्व होते. दिव्याचा उजेड दिसत होता, पण दिव्याखाली काजळी वाढत चालल्याचे कोणालाही पहावयास मिळाले नाही. गजानन काळे व्यक्तिमत्वाला दुसरीही एक वेगळी झालर असू शकते, हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. ज्यावेळी गजानन काळे यांच्या पत्नी सौ. संजीवनी गजानन काळे यांनी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सौ. संजीवनी गजानन काळे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विविध आरोपांच्या फैरी केल्याने गजाननाची विविध रूपे नवी मुंबईकरांसमोर आली. अर्थात ही नाण्याची एकच बाजू आपणास दिसत आहे. गजानन काळे ज्यावेळी समोर येईल, तो आपली बाजू मांडेल, आरोपांचे खंडन करेल, स्वत:ची बाजू मांडण्यासाठी वस्तूस्थिती सादर करेल, त्यावेळी आपणास दुसरी बाजू समजणे आपणास शक्य होईल. तुर्तास सौ. संजीवनी गजानन काळे यांनी केलेल्या आरोपांवर, कैफीयतेवर गजानना तु हे केलेस, गजानना तु हे कसे करू शकतोस, इतकेच नाईलाजास्तव म्हणावे लागेल.
गजानन काळेंची चांगली बाजू सातत्याने दिसल्याने सौ. संजीवनी काळेंनी केलेल्या आरोपांवर सहजासहजी विश्वास ठेवणे अनेकांना शक्य होत नाही. गोरगरीबांच्या मुलांना डीएव्हीमध्ये अॅडमिशन मिळावे म्हणून स्वत:च्या आईची मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची तारीख असतानाही चार दिवस ऑपरेशन पुढे ढकलणारा गजानन, वाशी पोलीस ठाण्यात कठडीमध्ये शांतपणे पुस्तकांचे वाचन करणारा गजानन, नागरी समस्यांबाबत मुजोर पालिका अधिकाऱ्यांना दरडावून जाब विचारणारा गजानन, पामबीच मार्गावर रास्ता रोकोच्या वेळी पोलिसांच्या हातून बेदम मार खातानाही प्रत्येक कार्यकर्त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करणारा गजानन, जेतवन या शब्दाचा अर्थ काही सेंकदात सांगून त्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगणारा गजानन, एक बिस्लेरीच्या पाण्यावर व एक-दोन चहावर तासोनतास वैचारिक गप्पा झाडणारा गजानन, जनसामान्यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने भूमिका मांडणारा व प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात रागाने तांडव करणारा गजानन अशी विविध रूपे गजानन काळेची नवी मुंबईकरांनी जवळून पाहिली आहेत, तसेच शेकडोच्या संख्येनी नवी मुंबईकरांनी अनुभवली आहेत. पण गजाननाचे हे एक रूप होते, पण सौ. संजीवनी गजानन काळेंच्या आरोपातून निर्माण झालेले गजानन काळेंचे दुसरे रूप सामोरे आले आहे. अर्थात त्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. कारण ही एक बाजू आहे. गजानन काळे ज्यावेळी आपली भूमिका मांडेल, त्यावेळी कदाचित दुसरीच बाजू समोर येईल.
गजानन काळे व सौ. संजीवनी गजानन काळे यांच्यातील कौंटूबिक वाद घराच्या चौकटीबाहेर येवून पोलीस ठाण्यात दाखल झाला. घरातील वाद चावडीवर आल्यावर अनेकांना न्यायाधीश होण्याची व निवाडा करण्याची आपल्या देशात उत्सूकता असतेच. गजानन काळे यांच्या कौंटूबिक कलहामध्येही तेच झाले. गजानन काळेंचा कौंटूबिक वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वी काळे अथवा मनसेवर आरोप करण्यास कोणी फारसे धाडसही दाखवित नव्हते. गजानन काळे कौंटूबिक कलहामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या महिला रणरागिनी रस्त्यावर उतरल्या, गृहमंत्र्यांना भेटल्या. सौ. संजीवनी गजानन काळे यांनाही भेटून त्यांचे सांत्वन केले, धीर दिला, दिलासा दिला. अगदी योग्यच केले. कोणताही मानव रूपातील नराधम आपल्या आयाबहीणींना त्रास देत असेल, त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करत असेल तर समाजाने त्या महिला भगिनीच्या पाठीशी उभे राहीलेच पाहिजे. त्यामुळे समाजातील कोणताही नराधम यापुढे आपल्या आयाबहीणींचा छळ करण्याचे धाडस दाखविणार नाही. पण गजानन काळेंच्या प्रकरणात आक्रमकता दाखविणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या आक्रमक रणरागिनी मागील काही प्रकरणात का शांत बसल्या होत्या, तेच समजत नाहीत? मागे काही वर्षापूर्वी नवी मुंबईतील दोन शिवसेना नेत्यावरही महिलांकडून अत्याचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीच्या माथाडी चळवळीशी संबंधित एका नेत्यावरही महिलेकडून अत्याचाराचा आरोप झाला होता. त्यावेळी का कोणी रस्त्यावर उतरले नाही. गृहमंत्र्यांना भेटले नाही. त्यावेळी तर चित्रा वाघ तर राष्ट्रवादीतच होत्या. आरोपही राष्ट्रवादीच्याच नेत्यावर झाले होते. का यापैकी कोणी आगपाखड केली नाही, संताप व्यक्त केला नाही. चित्रा वाघही त्यावेळी नरो वा कुंजरो च्या मानसिकतेत होत्या. आताच्या काळे कौंटूबिक कलहामध्ये आक्रमक असणाऱ्या सर्वच रणऱागिनींना एकच भोळाभाबडा प्रश्न यानिमित्ताने विचारावासा वाटतो – त्यावेळी राधासुता तुझा धर्म कोठे गेला होता?
सौ. संजीवनी गजानन काळे यांनी केलेले आरोपात खरोखरीच सत्यता असेल तर गजानन काळे हा विषय नवी मुंबईकरांसाठी पूर्णपणे संपलेला असेल. पण त्यासाठी आपण सर्वानी थोडा वेळ वाट पाहणे आवश्यक आहे. पोलिसांनीही लवकरात लवकर गजानन काळेंचा शोध घेवून आपल्या कार्यक्षमतेवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना कृतीतून उत्तर देणे आवश्यक आहे. गजानन काळेंचा कौंटूबिक वाद आता स्थानिक पोलिसांपासून गृहमंत्री, विधान परिषद उपसभापती, केंद्रीय मंत्री, महिला आंदोलने, सामाजिक संघटना यांच्या दालनापर्यत जावून पोहोचला आहे. सध्या काही दिवसांनी गजानन काळेंचा पोलिसांना शोध लागल्यावर अथवा गजानन काळे स्वत:हून हजर झाल्यावर या प्रकरणातील सत्यता अथवा दुसरी बाजू समजणे शक्य होणार आहे. राज्यात स्वतंत्र पोलिस यंत्रणा आहे, न्यायालयीन यंत्रणा आहे, ते त्यांचे काम करत असताना इतरांनी न्यायाधीश बनून कोणावरही चिखलफेक करण्याचे उद्योग करून नये. कारण राजकारण हा एक चिखलाचा बाजार झाला आहे. एकाद-दुसरा कमळावानी पवित्र असेलही. पण सुपात असणारे कधीतरी जात्यात जाणारच. ही तर सुरूवात झाली आहे. यापुढे वेळोवेळी असे प्रकार सुरू झाल्यास चावडीगप्पांना उधान येणार.
समाजाच्या समस्या सोडविणाऱ्या गजानन काळेला घरातील समस्या सोडविण्यास अपयश आले. समाजातील अनेकांच्या समाधानासाठी झटणारा गजानन काळे आपल्या पत्नीला सौ. संजीवनी गजानन काळे यांना समाधानी ठेवू शकला नाही. सौ. संजीवनी गजानन काळे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना झाडलेल्या एकामागोमाग एक आरोपांच्या फैरीमुळे गजानन काळेंसह त्यांचे निकटवर्तीय सहकारी, जवळचे बाळसेदार कार्यकर्ते, पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, मनसेच्या कामगार संघटनेसह अन्य सेलचे पदाधिकारी आज संशयाच्या जाळ्यात अडकले आहेत. उलटसूलट चर्चा आज त्यांच्या नावावर , कार्यावर चावडी गप्पांमध्ये खपविली जात आहे. काळात ओघात यातील सत्य बाहेर येईलच, तुर्तास पोलिसांना व न्याय यंत्रणेला त्यांचे कार्य करू द्या. गजानन काळेंच्या बाबतीत जाता जाता खेदाने एकच नमूद करावे लागेल, ते म्हणजे- गजानना कोण होतास तू आणि काय झालास तू!
:- संपादक – संदीप खांडगेपाटील
संपर्क : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३