नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम तलावांची माहिती नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून प्रकाशित करण्याची मागणी भाजपच्यामाजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गणेशोत्सव आता जेमतेम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. कोरोना महामारीचे प्रमाण महापालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कमी झाले असले तरी संपलेले नाही. गणेश विसर्जनासाठी तलावांवर होणारी गर्दी पाहता पालिका प्रशासनाकडून कृत्रिम विसर्जनाची करण्यात येणारी व्यवस्था खरोखरीच प्रशंसनीय आहे. कृत्रिम विसर्जनाची व्यवस्था दरवर्षी करण्यात यावी. महापालिका प्रशासन यंदाही कृत्रिम तलाव निर्माण करणार आहे का याची माहिती मिळावी. तसेच नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव बनविण्यात येणार आहेत, त्याची यादी महापालिका प्रशासनाने प्रकाशित करावी. ऐन गणेशोत्सवात यादी प्रकाशित झाल्यास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धामधुमीत कृत्रिम तलावाची यादी प्रसिध्द झाल्यास भाविकांना ती समजणे अवघड जाते आणि भाविक जवळचे कृत्रिम विसर्जन स्थळ सोडून नेहमीच्या तलावाकडे जातात. हे टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या अगोदर काही दिवस कृत्रिम तलावाची विभागानुसार यादी प्रकाशित करण्यात यावी की जेणेकरून सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, राजकीय व अन्य घटक यांना आपापल्या परिसरात जनजागृती करणे शक्य होईल. तरी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर कृत्रिम तलावाची यादी प्रसिध्द करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केली आहे.