नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल-उरण भागात होणाऱ्या सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये त्या त्या भागातील स्थानिक रहीवाशांसाठी ठराविक कोटा आरक्षित ठेवण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईत गृहनिर्माण प्रकल्पांसाठी जागा फारशा शिल्लक नसल्याने मागील काही वर्षापासून पनवेल-उरण तालुक्यात सिडकोच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम वाढीस लागले आहे. परंतु पनवेल-उरण भागात गृहनिर्माण प्रकल्पांचे काम करताना तेथील स्थानिकांच्या निवासी सुविधेचा सिडकोने फारसा गांभीर्याने विचार केला नाही. पनवेल-उरण भागातील स्थानिक ग्रामस्थांना व रहीवाशांनाही सदनिकेची गरज आहे. त्यांच्या परिवारात अनेकांचे वास्तव्य आहे. त्यांनाही निवासी गरजेसाठी नजीकच्या भविष्यात व सध्याच्या काळातही सदनिकांची गरज आहे. सिडको उभारत असलेरल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे ग्रामीण व राज्याच्या इतर भागातून लोक सदनिका घेत असल्याचे प्राधान्याने पहावयास मिळते. त्यामुळे स्थानिकांच्या गरजांकडे कानाडोळा करून इतर भागातील रहीवाशांना निवारा उपलब्ध करून देण्याची सिडकोची आजवरची भूमिका चुकीची आहे. त्यामुळे यापुढे पनवेल-उरण भागातील गृहनिर्माण प्रकल्पासाठी सोडत (लॉटरी) काढताना पनवेल-उरण भागातील स्थानिक ग्रामस्थांसाठी आणि रहीवाशांसाठी त्यामध्ये ठराविक टक्के कोटा आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. पनवेल-उरणमध्ये निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये स्थानिकांचाही समावेश असावा यासाठी संबंधितांना योग्य ते निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.