संपादक : संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ‘फेस्टीव्हल अॅडव्हान्स’ आणि अतिवृष्टी भागात मदतकार्य करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचारी, वैद्यकीय पथक व अधिकारी यांना विशेष भत्ता देण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. महागाई वाढत चालली आहे. कोरोनामुळे प्रत्येकाचेच अर्थकारण विस्कळीत झालेला आहे. महापालिका प्रशासनाकडून कर्मचारी व अधिकाऱ्यांना ‘फेस्टीव्हल अॅडव्हान्स’ जेमतेम ७ ते १२ हजार रूपये मिळतात. यात फेस्टीव्हल साजरा होत नाही, उलट कर्ज काढावे लागत आहे. वाढती महागाई आणि कोरोना महामारीमुळे आलेली हतबलता या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी २५ हजार रूपये ‘फेस्टीव्हल अॅडव्हान्स’ देण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्र्रशासनाकडे केली आहे.
मागील महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण भागासह पश्चिम महाराष्ट्राची हानी झाली. घराघरात गाळ व चिखल पसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तेथील जनतेला मदत करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी, अधिकारी तसेच वैद्यकीय पथके तातडीने मदतीसाठी चिपळूण, महाड आणि कोल्हापुर भागात पाठविली. या सर्वानी केलेल्या कामाची तेथील प्रशासनाने तसेच राजकीय घटकांनीही प्र्रशंसा केली. तथापि या कामगारांना व अधिकाऱ्यांना मनपाकडून अजून विशेष भत्ताही मिळालेला नाही., हा विशेष भत्ता लवकरात लवकर संबंधितांना देवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी प्रशासनाकडे केली आहे.