संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राजकारण्यांना घरी जावून दर महिन्याला लाखो रूपये भेट देणाऱ्या महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांनी भरलेला आजवरचा मालमत्ता कर परत करण्याची लेखी मागणी महापालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य व सारसोळे गावचे ग्रामस्थ मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गजानन काळे व सौ. संजीवनी गजानन काळे या पती-पत्नीमधील कौंटूबिक कलहामध्ये महापालिका प्रशासनातील काही गोष्टी चव्हाट्यावर आलेल्या आहेत. गजानन काळे हे एका राजकीय पक्ष संघटनेचे नवी मुंबई प्रमुख आहेत. सौ. संजीवनी काळे यांनी या प्रकरणात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, अभियंता, विभाग अधिकारी हे आमच्या घरी येवून दर महिन्याला लाखो रूपये देत असल्याचे सांगितले होते. नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत भरणा हा नवी मुंबईकर भरत असलेल्या मालमत्ता करातूनच होत असतो. त्यातून विकासकामे व्हावीत, नागरी समस्यांचे निवारण व्हावे यासाठी हा मालमत्ता कर वापरला जातो. मात्र महापालिका अधिकारी पर्यायाने महापालिका प्रशासन राजकीय घटकांना घरी जावून दर महिन्याला लाखो रूपयांच्या भेटी देत असतील तर ती धक्कादायक बाब आहे. नवी मुंबईकरांच्या घामाचा पैशाचा नजराणा महापालिका प्रशासन राजकीय घटकांना घरपोच सादर करत असेल तर ती संतापजनक बाब आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांची व याप्रकरणी झालेल्या आरोपांची प्रशासकीय पातळीवर तसेच पोलिसांकडून चौकशी करणे आवश्यक आहे. नवी मुंबईकरांच्या पैशाची अशा स्वरूपात धुळधाण होत असेल तर महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांनी महापालिका प्रशासनाला आजवर भरणा केलेला मालमत्ता कर परत करावा व राज्य सरकारनेही या प्रकरणाची चौकशी करत मालमत्ता कर परत करण्याचे महापालिकेला आदेश देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.