सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईतील नाल्यामध्ये रासायनिक व दूषित पाणी सोडून नवी मुंबईकरांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या कंपन्या व कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई एमआयडीसीमध्ये अनेक रासायनिक कंपन्या व कारखाने आजही कार्यरत आहेत. या कंपन्या व कारखान्यातून निघणारे सांडपाणी केमिकलचे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडण्यात येत आहे. यामुळे रबाले एमआयडीसी, कोपरखैराणे, घणसोली, महापे, पावणे, जुईनगर आदी भागातील रहीवाशांना या केमिकलयुक्त पाण्याच्या दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. श्वास घेण्यासाठीही तेथील रहीवाशांना त्रास होत आहे. सकाळी दरवाजा, खिडक्या उघडल्यावर काही भागात काजळी साफ करावी लागत असल्याचे रहीवाशांचे म्हणणे आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून वृक्षसंपदेचेही नुकसान होत आहे. लोकांना कर्करोगाची लागण होत असून चेंबूरमधील नाहूरसारखी किंबहूना त्याहूनही महाभयावह दुर्घटना तसेच जिवितहानी या भागात होण्याची भीती आहे. या कंपन्या व कारखान्यांवर कठोर कारवाई करून नाल्यात केमिकलयुक्त दूषित पाणी न सोडण्याचे आदेश द्यावेत. नवी मुंबईकरांच्या निरोगी जिवितासाठी, आरोग्य रक्षणासाठी या कंपन्या व कारखान्यांनी नाल्यात कोणतेही विनाप्रक्रिया रासायनिक केमिकल्स सोडू नयेत यासाठी राज्य सरकारने एमआयडीसी, महापालिका प्रशासनालाही या कंपन्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.