पनवेल संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कर्नाळा बँक बुडित प्रकरणानंतर पनवेल आणि रायगडचे राजकारण ढवळून निघाले असतानाच गलिच्छ राजकारणाने थेट कर्नाळा बँकेत पुन्हा शिरकाव करण्यासाठी अवसायकांच्या बदलीचा घाट घालून सहकार खात्यामार्फत त्यांची तडकाफडकी बदली केली आली आहे. अवघ्या ९ दिवसात अवसायक बदलण्याचे सहकार आयुक्तांनी कुणाच्या दबावाखाली हत्यार उपसले याची चर्चा सुरू झाली आहे.
२० फेब्रुवारी २०२० पासून कर्नाळा बँकेवर जिल्ह्याचे उपनिबंधक जी. जी. मावळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ९ ऑगस्टला रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर १७ ऑगस्टला सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी मावळे यांच्या अवसायकपदाच्या नियुक्तीचे आदेश बजावले. त्यानुसार त्यांनी पदभार स्वीकारला. दोनच दिवसांपूर्वी कवडे यांच्या आदेशाप्रमाणे डिपॉझिट इन्सुरन्स क्रेडिट गॅरंटी कापॉरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ई. संगीता यांनीही मावळे यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र घोषित केले. असे असताना २६ ऑगस्टच्या एका आदेशानुसार मावळे यांच्याकडून सुत्रे काढून घेताना नव्या आदेशानुसार कवडे यांनी पनवेलचे सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांची नियुक्ती करून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना मोठा धक्का दिला आहे.
मावळे हे क्षेणी-१ चे अधिकारी असून त्यांच्याकडून तडकाफडकी सुत्रे काढून घेताना आयुक्तांनी त्यांच्या जागी निम्नस्तरीय ब-क्षेणीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कर्नाळा बँक बुडित निघाल्यानंतर बँकेच्या कारभारात मावळे यांनी कुणाही राजकीय नेत्यांना ढवळाढवळ करू दिली नव्हती. त्याशिवाय वसुलीसाठी अनेकांविरूद्ध सहकार खात्याच्या कलम १०१ अन्वये कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे काही राजकीय नेते आणि त्यांचे प्यादे अडचणीत सापडले आहेत. त्यातच ठेवीदारांना विम्याचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने तिथे श्रेयवादासाठी काहींनी हातपाय पसरले आहेत. परंतु, मावळे यांचा अडसर ठरत असल्याने सहकारमंत्र्यांकडून मावळे यांच्या बदलीसाठी दबावतंत्र वापरल्याची खास माहिती उपलब्ध होत आहे.
याबदलीप्रकरणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सकाळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकारचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मावळे यांची बदली रद्द करण्याचे साकडे घातले आहे. त्याशिवाय त्यांनी संबंधितांसह आयुक्तांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कर्नाळा बँक प्रकरणात ठेवीदारांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले तेवढे थोडे झाले. आता त्यांच्या भावनांशी कुणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नसल्याचा गंभीर इशारा कडू यांनी लेखी स्वरूपात दिला आहे.