सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावात घरटी आरोग्य अभियान राबविण्याची लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीमुळे गेली पावणे दोन वर्षे नवी मुंबईतील रहीवाशी आणि प्रकल्पपग्रस्त, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यातच डेल्टा, म्युकरकोसिसचे सावट आहे. तिसरी लाट येणार म्हणून भय कायम आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसापासून नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी आणि सारसोळे गावचे ग्रामस्थ सांधेदुखी, पायाला सुज येणे, अंग दुखणे, कणकण जाणवणे अशा व्याधींचा सामना करत आहे. ही व्याधी अचानक शंभराच्या आसपास रहीवाशी व ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे. अचानक हे आजार बळावल्याने नेरूळ सेक्टर ६ मधील रहीवाशी आणि सारसोळे गावचे ग्रामस्थ चिंतातूर आहेत. हे साथीचे आजार आहेत अथवा कोरोनामुळे निर्माण झालेले आजार आहेत, याबाबत संभम्रावस्था कायम आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर ६ परिसरात तसेच सारसोळे गावात घरोघरी जावून रहीवाशांची व ग्रामस्थांची आरोग्य विषयक चाचपणी अभियानाच्या माध्यमातून करावी. उद्या या आजाराचा उद्रेक झाल्यास जिवितहानी होण्याची भीती आहे. अचानक निर्माण झालेल्या व्याधीबाबतही पालिका प्रशासनाला अभियानामुळे माहिती होईल व उपचार करणे सोयिस्कर होईल. त्यामुळे संबंधितांना नेरूळ सेक्टर ६ व सारसोळे गावात घरटी आरोग्य अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.