शिवसेना विभागप्रमुख, माजी नगरसेवक, माजी पक्षप्रतोद रतन मांडवेंनी केली लेखी जाहिर नाराजी व्यक्त
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : टेंडर अथवा रिटेंडर महापालिकेत भरण्यासाठी सुट्टीचा दिवस वगळून कामाचा दिवस (वर्किग डे) निश्चित करण्याची लेखी मागणी शिवसेना विभागप्रमुख, शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी पक्षप्रतोद रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून टेंडर व रिटेंडर भरण्यासाठी अंतिम दिवस रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीचा दिवस ठेवणे चुकीची बाब आहे. ज्यांना टेंडर अथवा रिटेंडर भरावयाचे असेल त्यांना धावपळ करावी लागते. कागदपत्रांची जमवाजमव करताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे गैरसोय होते. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापण विभागाकडून दैनंदिन साफसफाई व पावसाळा पूर्व गटर साफसफाईचे बेलापुर विभाग २, नेरूळ विभाग १, तुर्भे विभाग २, कोपरखैराणे विभाग १ याकरिता फेरनिविदा मागविण्यात आली. तथापि फेरनिविदा सादर करण्याची अंतिम तारीख रविवारी २९ ऑगस्ट ठेवण्यात आली. तत्पूर्वी २८ ऑगस्ट हा चौथा शनिवार, म्हणजेच पालिका बंद. अशा वेळी कोणा इच्छूकास टेंडर भरावयाचे असल्यास शेवटचे दोन दिवस महापालिका प्रशासन बंद असताना, त्यात सुट्टीच्या दिवसात टेंडर भरण्यास अडथळा निर्माण झाल्यास कोणाकडून मार्गदर्शनही प्राप्त होत नाही. त्यामुळे या घटनेमध्ये अनेक लोकांची शेवटचे दोन सुट्टीचे असल्याने गैरसोय झालेली आहे. त्यामुळे आपण संबंधितांची झालेली गैरसोय पाहता या फेरनिविदेकरता किमान अजून दोन ते चार दिवसाची मुदतवाढ देणे आवश्यक आहे. परिस्थितीची वस्तूस्थिती जाणून घेता आपण सकारात्मक दृष्टीकोनातून यावर लवकरात लवकर निर्णय जाहिर करण्याची मागणी रतन मांडवे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सोमवारी महापालिका मुख्यालयात जावून रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त ढोले यांची भेट घेत त्यांनाही सुट्टीच्या दिवशी अंतिम दिवस ठेवल्याने टेंडर अथवा रिटेंडर भरणाऱ्यांची गैरसोय होत असल्याने वर्किग डेच अंतिम दिवस ठेवण्याची पुन्हा एकवार मागणी केली.