सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैराणे नोडमधील प्रभाग ४२ मध्ये साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैराणे नोडमध्ये प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १६,१७, २२,२३ या परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रभागात विशेषत: सेक्टर १६, १७ मध्ये तापाचे, मलेरियाचे व डेंग्यूचेही रूग्ण आढळून येवू लागले आहेत. सेक्टर २२,२३ मध्येही काही प्रमाणात मलेरियाचे रूग्ण आढळून येवू लागले आहेत. सेक्टर २२,२३ हा परिसर खाडीकिनारी येत असल्याने स्थानिक रहीवाशांना दरवर्षीच साथीच्या आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही प्रभागात साथीच्या आजाराचे रूग्ण आढळून येवू लागले आहेत. रूग्णं खासगी दवाखाने व रूग्णालयात चाचणी व उपचार करत असल्याने व तेथील दवाखाने व रूग्णालयांकडून पालिका प्रशासनाला कळविले जात नसल्याने साथीच्या आजाराबाबत पालिका प्रशासनाला कल्पना येत नाही. डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीच्या आजारांवर महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना तातडीने सातत्याने धुरीकरण, गटारांमध्ये तसेच साचलेल्या पाण्यामध्ये अळीनाशके, मलेरिया, डेंग्यूचा रूग्ण असणाऱ्या भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये साथीच्या आजारावरील पावडरची फवारणी आदी मोहीम राबवावी. पालिका प्रशासनाकडे या घटनेचे गांभीर्य जाणून न घेतल्यास प्रभाग ४२ मध्ये साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. साथीच्या आजाराचे प्रभागातील वाढती रूग्ण संख्या पाहता प्रभाग ४२ मध्ये तातडीने साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.