सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबविण्याची मागणी प्रभाग ८५च्या भाजपच्या माजी नगरसेविका व महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ८५ व ८६ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसराचा समावेश होत आहे. सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६ परिसर हा पूर्णपणे खाडीकिनाऱ्यालाच लागून असल्याने येथील रहीवाशांना व ग्रामस्थांना दरवर्षी न चुकता साथीच्या आजारांचा सामना करावाच लागतो. डासांचा त्रास हा बाराही महिने सहन करावा लागत आहे. येथील रहीवाशी व ग्रामस्थ पालिका प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत गेल्या पावणे दोन वर्षापासून कोरोना महामारीशी संघर्ष करत आहे. महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालनही करत आहेत. त्यातच कोरोना महामारीची तिसरी लाट येणार असल्याने ग्रामस्थांच्या व रहीवाशांच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार कायम आहेच. डेल्टा, म्युकरमायकोसिससह इतर नवनव्या आजारांचे भयही सोबतीला असल्याचे सौ. सुजाता सुरज पाटील यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
साथीच्या आजारामधील ताप, मलेरिया, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी आजाराचे रूग्ण काही प्रमाणात परिसरात दिसून येतात., खासगी रूग्णालये व दवाखान्यात फेरफटका मारला असता विभागातील नागरीक या आजारावरील उपचार घेताना पहावयास मिळतात. खासगी रूग्णालये व खासगी दवाखाने या रूग्णांबाबत, आजाराबाबत पालिका प्रशासनाला काहीही कळवत नसल्याने साथीच्या आजाराचे गांभीर्य महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे उपाययोजना करण्यास मर्यादा पडतात. परंतु उपाययोजना न झाल्यास साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. रहीवाशांना व ग्रामस्थांना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. काय काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात, काय टाळावे, याबाबत संबंधितांना मार्गदर्शन झाल्यास आजारांचा शिरकाव होण्यास प्रतिबंध करता येईल. आजारमुक्त निर्भयपणे जीवन जगता येईल. त्यामुळे साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर व कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये ग्रामस्थांच्या व रहीवाशांच्या जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबविणेसाठी तसेच येथील सारसोळे व कुकशेत गावातील महापालिका शाळेमध्ये तसेच समाजमंदिरामध्ये मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करणेसाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.