केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’
जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त ‘मित्रों’साठी मोदींचा कारभार
मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर १९० रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी ४४० रुपये असणारा हाच एलपीजीगॅस आता ९०० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९०० रुपयांपर्यंत महाग केला, एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने ६७ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल १०७ रुपये, डिझेल ९६ रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.
केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू नये यासाठी इंधन व गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिली जात होती ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. युपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे. २०१४ साली खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसह मध्यमवर्गांचे जगणेही मुश्कील करुन ठेवले आहे. काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत सात वर्षांपासून धडाक्यात सुरु आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करुन देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरु आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरुन जनतेत प्रचंड आक्रोश आहे, ही जनताच आता भाजपा व मोदींना त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.