सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेपाळी वॉचमन व त्यांच्या परिवारासाठी तातडीने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका व माजी महिला बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून गेल्या पावणे दोन वर्षात करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांमुळे तसेच नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते , ठाण्याचे माजी पालकमंत्री व आमचे श्रध्देय असलेले आ. गणेश नाईकसाहेबांच्या या काळातील कार्यामुळे कोरोना महामारीचे प्रमाण आटोक्यात आलेले आहे. नागरी आरोग्य केंद्र, वाशीचे प्रथम संदर्भ रूग्णालय, महापालिका शाळा, ग्रंथालये आदी ठिकाणाहून सुरू असलेल्या लसीकरणाच्या अभियानामुळे अनेकांना लसीकरणाचे डोस मिळणे सुलभ झालेले आहे. महापालिका पातळीवर तसेच खासगी स्तरावरही करण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणात आधार कार्ड बंधनकारक केल्यामुळे नव्याने निर्माण झालेली अडचण आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या, कंपन्या, कारखाने आदी ठिकाणी नेपाळी बांधव वॉचमनचे तुटपुंज्या वेतनावर काम करत असतात. त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्या पत्नी, आई, बहीण यादेखील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुणी, भांडी, लादी सफाईचे काम करत असतात. परंतु ते भारतीय नसल्याने त्यांच्याकडे आधारकार्ड नाही, परिणामी त्यांना प्रशासकीय तसेच खासगी स्तरावर सुरू असलेल्या लसीकरणाचा लाभ घेता येत नाही. परंतु नेपाळी वॉचमनचा सोसायटीतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वाशीच संबंध येतो. तसेच महिला घरकाम करत असल्याने त्यांचा घरातील महिलांशी, मुलांशी संबंध येतो. त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असलो तरी थेट घराशी, सोसायटी आवाराशी संबंध असणाऱ्या नेपाळी जनसमुदायाला लस न भेटल्यास एकप्रकारे कोरोना महामारीला आपण शिरकाव करण्यास या माध्यमातून एकप्रकारे निमत्रंणच देत आहोत. आपण नेपाळी वॉचमन व त्यांच्या परिवारासाठी दोन दिवसीय स्वतंत्र लसीकरण शिबिर तातडीने आयोजित करणे आवश्यक आहे. याबाबत असंख्य नेपाळी बांधव व त्यांचा परिवार लसीकरणाबाबत सातत्याने आमच्याकडे विचारणा करत असतात. कोरोना शतप्रतिशत आटोक्यात आणण्यासाठी नेपाळी वॉचमन व त्यांच्या परिवारासाठी दोन दिवसीय स्वतंत्र लसीकरण शिबिर लवकरात लवकर आयोजित करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.