बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : रत्नागिरी येथे मंजुर झालेल्या उर्दू भाषा भवनाची लवकरात लवकर निर्मिती करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सर्वप्रथम हाजी शाहनवाज खान यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने उर्दू भाषा भवनाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला , त्याबाबत सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे व राज्य सरकारचे एमआयएम विद्यार्थी आघाडीकडून अभिनंदन करत निवेदनाच्या सुरूवातीलाच आभार मानले.
मुळातच कोकण भागात मुस्लिमांची लोकसंख्या लक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यत कोकणातील मुस्लिम समाजाने आपले योगदान दिलेले आहे. देशविघातक शक्तींच्या विरोधात लढा उभारतानाही कोकणातील मुस्लिम जनसमुदाय कोठेही मागे हटलेला नाही. आजवर कोकणात हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्माची माणसे गुण्यागेाविंदाने राहीलेली असून येथे कधीही धर्मवादाला कोणीही खतपाणी घातले नाही व घालणारही नाही. उभ्या महाराष्ट्राला कोकणातील हिंदू-मुस्लिम एकोप्याने एक आगळेवेगळे दर्शन घडविले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भाषा भवनाच्या निर्मितीचा घेतलेला निर्णय स्तुत्य व प्रशंसनीय असल्याचे हाजी शाहनाज खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या काही घटकांकडून उर्दू भाषा भवनाच्या निर्मितीला होत असलेला विरोध निरर्थक आहे. कोकणातील मुस्लिम समाजाने कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या भवनाला, कार्यक्रमाला विरोध केलेला नाही आणि करणारही नाही. उलट त्यांचे भाषा भवन निर्माण होत असल्यास मुस्लिम समाज बांधकाम करण्यास स्वत:हून सहकार्यच करेल. असे असतानाही उर्दू भाषा भवनाला होत असलेला निर्णय केवळ राजकारणाचा भाग असून त्यामुळे दोन समाजात वितुष्ठ निर्माण होण्याची भीती आहे. आजवर एकोप्याने व गुण्यागोविदांने राहणाऱ्या दोन समाजात फूट पाडण्याचे हे षडयंत्र आहे. या षडयंत्राला बळी न पडता राज्य सरकारने लवकरात लवकर उर्दू भाषा भवनाची निर्मिती करण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.