संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
पनवेल : माथेरान गिरीक्षेत्र येथे ‘साहसी खेळास’ परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी (दि. ७ सप्टेंबर) दिल्ली येथे केली.
या संदर्भात नामदार जी. किशन रेड्डी यांना यावेळी निवेदनही देण्यात आले. यावेळी चर्चा करताना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मंत्री महोदयांना सांगितले कि, महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असलेले ‘माथेरान गिरीस्थान’ हे जगातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर हा उच्च उंचीचा परिसर भारत सरकारने ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केला आहे. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित, हा परिसर उद्योग आणि वाहन मुक्त आहे. त्याची ‘टॉय ट्रेन’ आणि पर्यावरणपूरक वातावरण हे जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे दहा लाख पर्यटक माथेरान गिरीक्षेत्रात पर्यटनाचा आनंद घेतात. अधिकाधिक पर्यटकांना या क्षेत्राकडे आकर्षित करून, पर्यटन वाढीसाठी ‘साहसी खेळ’ असणे आवश्यक आहे. साहसी खेळांना आज जगभरात मान्यता मिळाली आहे आणि पर्यटकांमध्ये साहसी खेळांचे विशेष आकर्षण आहे. यामुळे माथेरान गिरीक्षेत्र येथे पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक लोकांचा रोजगारही वाढेल, त्यामुळे माथेरान गिरीस्थानमध्ये पर्यटन, विकास आणि स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी ‘साहसी खेळास’ परवानगी देण्यात यावी, अशी महत्वपूर्ण मागणी केली.