संपादक : सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmailcom
नवी मुंबई / पनवेल :- खेड ते दापोली या महामार्गाची तातडीने दुरूस्ती करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
गणेशोत्सवाचे दिवस सध्या सुरू आहेत. गणेशोत्सव आणि कोकणातून उपजिविकेसाठी शहरी भागात स्थायिक झालेले कोकणवासिय हे नाते उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कोकणातील माणूस उपजिविकेसाठी कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी गणेशोत्सवाच्या काळात तो आपल्या मुळ गावी कोकणात न चुकता येतच असतो. महाराष्ट्राच्या विकास होत असला तरी कोकणातील विकासाला कोणाचा शाप लागला आहे, तेच समजत नाही. कोकणच्या विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच होतो, कोकणी माणसाची दिशाभूल करण्यासाठी केवळ त्याला आश्वासनांचा डोंगरच उभा केला जातो. राज्यात महत्वपूर्ण ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचे काम सध्या जोराने सुरू आहे. परंतु कोकणच्या रस्त्यांचे काय? दरवर्षी कोकणातील माणूस खाचखळग्यांच्या रस्त्यातूनच गणेशोत्सवाला कोकणात येतो आणि गणेश विसर्जन झाल्यावर खाचखळग्यांच्या रस्त्यातूनच पोटापाण्यासाठी पुन्हा शहरात निघून जातो. यंदाही कोकणातील रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. प्रशासनाकडून कोकणकडे जाणाऱ्या अंर्तगत तर नाहीच, पण बाहेरील मुख्य मार्गाचीही डागडूजी करण्याची तत्परता प्रशासनाकडून दाखविण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणचा माणूस गणेशोत्सवासाठी येताना व गणेशोत्सव झाल्यावर जाताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रशासनाच्या नावाने अपशब्दांचा भडीमारच करत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कोकणचा भाग आणि अतिवृष्टी हे दरवर्षीचे समीकरण ठरलेले आहे. पावसामुळे याही वर्षी खेड – दापोली या महामार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे. खेड ते दापोली महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाहणी केल्यास त्यांना कोकणवासिय करत असलेल्या प्रवासाची कल्पना येईल. खेड ते दापोली महामार्गाचे पावसामुळे नुकसान झाले असून महामार्गावर ठिकठिकाणी छोटेमोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून चारचाकी वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रसंगही ठिकठिकाणी घडत आहेत. खड्ड्यात आदळून दुचाकी पडत असून दुचाकीस्वारांना किरकोळ ते गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत असून वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. अपघातात प्रवाशी व चालक जायबंदी होणे अथवा प्राणाला मुकण्याची भीती आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राज्यातील रस्ते दुरुस्ती, नूतनीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पावसाळ्यानंतर रस्ते खराब झाल्यास अशा रस्त्यांची दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. परशूरामाची भुमी असलेल्या कोकणच्या रस्त्याची किमान गणेशोत्सवापूर्वी सरकारने डागडूजी करणे आवश्यक आहे. परंतु सरकारकडून ते होत नसल्याने कोकण भागातील आमदार, खासदार, राज्यातील व केंद्रातील मंत्र्यांचे आपल्या कोकणवर किती प्रेम आहे याचा कोकणवासिय नक्कीच विचार करतील. समस्येचे गांभीर्य पाहता व रस्त्यावरील खड्डे तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कोकणवासियांना प्रवासात होणाऱ्या यातना पाहून संबंधितांना खेड ते दापोली महामार्गाच्या दुरूस्तीचे व डागडूजीचे आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.