संपादक : सौ. सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील : ९८२००९६५७३
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई / पनवेल : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड या तीन तालुक्यामधील वीजेचा खेळखंडोबा थांबवून कोकणवासियांना दिलासा देण्याची मागणी एका लेखी निवेदनातून एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोकणचा कॅलीफोर्निया करण्याची भाषा करताना आजवर कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार त्या त्या काळातील राज्यकर्त्यांनी केला आहे व आजही कोकणवासियांच्या समस्यांकडे कानाडोळा करत आपलेही सरकार मागच्याच सरकारचा कित्ता गिरवित आहे. कोकणचा विकास तर सोडाच, पण कोकणवासियांना सदोदित समस्येच्या विळख्यात ठेवून कोकणला भकास करण्याचे व कोकणवासियांना त्रासच देण्याचे काम प्रशासनाकडून प्राधान्याने केले जात असल्याचा आरोप हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सतत वीजपुरवठ्याचा खेळखंडोबाच असतो. जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड या तीन तालुक्यांमध्ये आठवड्यातून तीन दिवस वीज नसते. अंधारातच तेथील लोकांना दैनंदिन व्यवहार करावे लागतात. वीजेच्या नसण्याबाबतचे कारण वीज अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांचे ३३ केव्ही फॉल्टी आहे, हेच उत्तर नेहमी मिळते. मंडणगड ते दापोली आणि खेड ही विद्युत पुरवठा करण्यात येणारी मुख्य वाहिनी पूर्ण होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. मुख्य वाहिनीचे काम पूर्ण होवूनही ती कार्यान्वित का केली जात नाही, ते एक प्रश्नचिन्ह आहे. ती कार्यान्वित झाल्यास वीजेचा खेळखंडोबा संपुष्ठात येईल. जुनाट वाहिन्यात दऱ्याखोऱ्यातून व डोंगरातून आल्या आहेत. वीज गेल्यास दुरूस्ती करण्यासाठी दऱ्याखोऱ्यात, डोंगरात जावून वीज कर्मचाऱ्यांना उलथापालथ करावी लागते. नवीन मुख्य वाहिनी कार्यरत केल्यास वीज कर्मचाऱ्यांचाही त्रास वाचेल. वीज मंडळाच्या कारभाराबाबत संताप येत असून अंधेर नगरी चौप्पट राजा असा हा कारभार सुरू आहे. मुख्य वाहिनी सुसज्ज असतानाही कार्यरत न करता कर्मचाऱ्यांना वीज दुरूस्तीबाबत डोंगर दऱ्यात हेलपाटे मारावे लागतात. वीज नसल्याने नागरिकांना त्रास आणि वीज पुरवठा दोष दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांना त्रास. कोणाच्या सुपिक डोक्यातून हा कारभार चालविला जात आहे, याची राज्य सरकारने युध्दपातळीवर चौकशी करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यातील कोकणवासियांची वीजेच्या खेळखंडोबातून सुटका करण्यासाठी मुख्य वाहिनी कार्यान्वित करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.