कोरोना महामारीने जगाच्या कानाकोपऱ्यात उलथापालथ केली आहे. जागतिक पातळीवरही सर्व होत्याचे नव्हते झाले आहे. कधी काळी कोणी अपेक्षाही केली नसेल अथवा स्वप्नातही पाहिले नसेल, इतकी विचित्र परिस्थिती आज कोरोना महामारीमुळे सर्वानाच अनुभवयास मिळत आहे. अर्थकारण मंदावले आहे.औद्योगिकरणाला अडथळे आले आहेत. कंपन्या-कारखाने बंद पडले आहे. वातानुकूलित कार्यालयांना आजही टाळे आहे. जगामध्ये बेरोजगारीचा भस्मासूर आधीच टाहो फोडत असताना त्याच कोरोना महामारीने अधिकच हातभार लावला आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगारांच्या संख्येत भर पडली आहे. त्यात घरातील अनेकांना कोरोना झाल्यामुळे बचती तोडाव्या लागल्याने अनेक मध्यमवर्गीय परिवारावर कफल्लक होण्याची वेळ आलेली आहे. अनेक महिलांना कोरोनामुळे अकाली वैधव्य आले तर अनेकांना आपले मातृ-पितृ छत्र हरवल्याने अनाथ होण्याची वेळ आली आहे. त्यातच कोरोना महामारीचा अंत कधी होईल याबाबतही कोणी छातीठोकपणे सांगत नसल्याने अजून काही काळ कोरोनाच्या संगतीतच घालवावा लागणार आहे. कोरोना महामारीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने निवडणूका लवकर व्हाव्यात यासाठी प्रस्थापित राजकारण्यांसह निवडणूक लढवू पाहणाऱ्या हवशानवशागवशा इच्छूकांनीही नक्कीच आपल्या घरातील देव पाण्यात ठेवले असणार. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेतील पाचव्या सभागृहातील लोकप्रतिनिधींचा कारभार संपला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाचव्या सभागृहाची मुदतही संपुष्ठात आल्याने राज्य सरकारला महापालिका प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी व नवी मुंबईकरांना नागरी सुविधा देण्यासाठी तसेच नवी मुंबईकरांच्या नागरी समस्या संपुष्ठात आणण्यासाठी आयुक्तांना प्रशासकपदी नियुक्त करून त्यांच्या हाती या शहराचा कारभार सोपवावा लागला. लोकप्रतिनिधींचा कारभाऱ एप्रिल २०२० मध्येच आटोपला असला तरी जानेवारी २०२० ला नवी मुंबईत कोरोना महामारीचे आगमन झाल्यावर सभागृहामध्ये फारसे, म्हणावे तसे कामकाज झाले नाही. महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक समोर ठेवून सर्व राजकीय घटक कोरोना महामारीचा उद्रेक असतानाही नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी सर्वपक्षीय राजकीय घटक रस्त्यावर उतरले. लोकांना सॅनिटायझर, मास्क, धान्य, कोरोना रूग्णांना रूग्णालयात प्रवेश, ऑक्सिजन, आयसीयू, इतकेच नाही तर कोरोना महामारीत दगावल्यावर रूग्णवाहीका मिळवून देणे, स्मशानात सर्व तजवीज करून देणे आदी कामे करण्यात नवी मुंबईतील सर्वच राजकीय घटकांचे पुढाकार व योगदान प्रशंसनीय होते. अर्थात सर्वाचाच हेतू काही समाजसेवी नसणार. काही घटक प्रामाणिकपणे जनसेवा करत असणार तर काही घटक येवू घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनसामान्यांमध्ये आपले अस्तित्व ठळकपणे दिसावे यासाठी कार्यरत होते. कोरोनाचा मुक्काम इतका लांबणीवर पडेल असे कोणाही राजकीय, सामाजिक घटकांनाच काय पण सर्वसामान्य जनतेलाही स्वप्नात वाटले नसणार. कोरोनाचा मुक्काम लांबू लागला तसे समाजसेवेचे प्रमाण कमी होवू लागले. खिशाला बसणारी झळ वाढू लागल्यावर अनेक हवशागवशानवशा राजकारण्यांनी आपला हात आखडता घेतला. प्रस्थापित राजकारण्यांपैकी अनेकांनी गावाला पळ काढला तर काहींनी कोरोना स्वत:ला अथवा घरातील कोणाला तरी झाल्याचे निमित्त पुढे करत लोकांचा संपर्क टाळण्यावर भर दिला. लोकांशी संपर्क म्हणजे लोकांच्या मागण्या पूर्ण करणे, लोकांच्या समस्या सोडविणे. कोरोना काळात अनेकांचे अर्थकारणच बिघडल्याने अनेकांच्या आर्थिक मदतीच्या अपेक्षा होत्या. त्यामुळे जनतेत मिसळणे म्हणजे खिशाला झळ देण्यासारखे आहे, याचा अंदाज राजकीय घटकांना आल्याने अनेकांनी कोरोना महामारीचे निमित्त पुढे करत केवळ भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यावर समाधान मानत रूग्णालयीन कामे करण्यावर भर दिला. भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या तसेच माजी नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागाप्रभागात एकदोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा धान्याचे वाटप केले. घरोघरी मास्क पुरविण्यात पुढाकार घेतला. रूग्णालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. या काळात ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांची शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका ठरली. नवी मुंबईकरांना मोफत धान्य देण्यापासून रूग्णालयीन सेवा मिळवून देण्यासाठी सक्रीय योगदान देताना कोठेही प्रसिध्दीचा फोकस आपणावर पडणार नाही व आपली भूमिका पडद्याआडचीच राहील ही काळजी संदीप नाईकांनी घेतली. भाजपच्या रणरागिनी आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही धान्य वाटपापासून ते अन्नाचे डब्बे पोहोचविण्याइतपत ग्रासरूटला काम केले. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनीही नवी मुंबईकरांसाठी लक्षणीय कार्य केले. कोरोना काळात शिवसेना संघटना कोठे खिळखिळी होवू नये म्हणून संघटनेचा मुख्य पाया असणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना आधार देण्याचे व त्यांना ताकद देण्याचे कामही या काळात विजय नाहटा यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या तसेच काही प्रमाणात मनसेच्याही घटकांनीही स्वत:च्या नोडनुसार काम करत नवी मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम केले आहे. अर्थात काही चमकेश घटकांनाही विसरता येणार नाही. दोन रूपया खर्च करून सोशल मिडियावर फोटोसेशन करण्यावर आघाडी घेण्यात चमकेश घटकांनी समाधान मानले आहे. अर्थात जनतेला काम करणारे व फोटोसेशन करून चमकेशगिरी करून धन्यता मानणारे कोण याचा जवळून अनुभव असल्याने जनताही निवडणूकीमध्ये या चमकेश घटकांना सोशल मिडियापुरतेच ‘भावी’ हे त्यांचे पद कायम ठेवणार, हे मात्र नक्की. नवी मुंबईतील राजकीय क्षेत्र आता चातकाप्रमाणे निवडणूकांची वाट पाहत आहे. निवडणूक लढविण्यासाठी जमा केलेला पैसा आता जवळपास संपत आल्याने निवडणूका लढविण्यासाठी पुन्हा जवळच्या नातलगाकडे, मित्र मंडळींकडे उधारउसनवारी करण्याची वेळ आलेली आहे. अर्थात ही अवस्था प्रस्थापितांचीही झालेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होत असताना, महाराष्ट्रातही विधानसभेच्या पोटनिवडणूका होत असताना नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सार्वत्रिक निवडणूका घेण्यामुळे कोणते आस्मानी संकट निर्माण होणार आहे, तेच समजत नाही. राज्य सरकार नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यास स्वारस्य का दाखवित नाही, तेच समजत नाही. निवडणूका कधीही होतील हे गृहीत धरूनच भाजप व शिवसेना हे दोन पक्ष कंबर कसून मागील काही महिन्यापासून जय्यत तयारी करत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घटकांचीही तयारी केवळ त्यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या प्रभागापुरतीच पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला दोन आकडी संख्याबळ गाठता येईल का यावरच प्रश्नचिन्ह असताना त्या दोन्ही पक्षात गटबाजीचेच प्रमाण अधिक आहे. अन्य राजकीय संघटना निवडणूकीत सहभागी होणार असल्या तरी त्यांचे खाते उघडेल की नाही याबाबतच प्रश्नचिन्ह आहे. चुकून खाते उघडले तर तेहत्तीस कोटी देव त्यांच्या मदतीला धावून आले असेच म्हणावे लागेल. निवडणूका लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. लोकांना त्यांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या हक्काचा माणूस त्यांच्याच विभागात उपलब्ध हवा. २० लाखाच्या आसपास नवी मुंबईत लोकसंख्या असून (कागदोपत्री १७-१८ लाख) कोरोना रूग्णांचे प्रमाण आता अवघे अर्धशतकाच्या जवळ आले आहे. पालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोना महामारी आता आटोक्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका निवडणूकीचे बिगुल कधी वाजते याचीच सर्व चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
बातमीसाठी संपर्क : Navimumbaillive.com@gmail.com