संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६९२२ (केवळ व्हॉटसअप)
Navimumbailive.com@ggmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणाची दुरावस्था तातडीने दुर करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर ६ परिसरात सिडको वसाहतीमध्ये शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर महापालिका प्रशासनाने राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणाची निर्मिती केली आहे. रविवार, दिनांक, १९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० ते ५.४० दरम्यान याच राजमाता जिजाऊ उद्यान मोठा काळा नाग लांबट आकाराचा दिसल्याने सर्वप्रथम समस्येचे गांभीर्य तात्काळ संदीप खांडगेपाटील यांनी आयुक्तांच्या निदर्शनास निवेदनातून आणून दिले.
आपण या उद्यानाला व क्रिडांगणाला भेट दिल्यास आपणास येथील दुरावस्थेचे, बकालपणाचे व महापालिका या उद्यान व क्रिडांगणाच्याबाबतीत आजवर दाखवित असलेल्या उदासिनतेचे दर्शन होईल. येथील क्रिडांगणात पावसामुळे जंगली गवत वाढले असून स्थानिकांकडून वारंवार लेखी मागणी करूनही गवत काढण्यास महापालिका प्रशासनाकडून आजतागायत काहीही कार्यवाही झालेली नाही. उद्यानाचे प्रवेशद्वार मागील अनेक महिन्यापासून तुटले असून ते एका भागात लोंबकळत असलेले पहावयास मिळेल. उद्यानातील झोपाळाही तुटला असून तोही लोंबकळत आहे. त्या झोपाळ्याखाली आपणास पाणी साचलेले पहावयास मिळेल. उद्यानातील एका खेळण्यातील तुटलेला बदक आजही कंपोस्ट खताच्या टाकीच्या छपरावर दिसून येईल. क्रिडांगणात आजही मोठमोठी दगडी, सिमेंटचे ठोकळे व पेव्हर ब्लॉक दिसून येतील. आज खुलेआमपणे नागाचे पहाटे स्थानिक रहीवाशांना दर्शन झाल्याने भविष्यात या दुरावस्थेमध्ये लपून बसलेल्या नागसापाने दंश करून जिवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार? महापालिका सभागृह बरखास्त झाल्यापासून महापालिका प्रशासनाने या उद्यान व क्रिडांगणाला वाऱ्याबर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था व बकालपणा हटवून स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. निवेदनासोबत संदीप खांडगेपाटील यांनी उद्यान व क्रिडांगणातील समस्या दाखवून देण्यासाठी छायाचित्रेही महापालिका आयुक्तांना सादर केली आहे.