नवी मुंबई : स्वाती इंगवले
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
कोकणच्या विकासासाठी मुंबई-गोवा महामार्ग, सह्याद्री मार्गाची उभारणी करून कोकणात सुसज्ज रस्त्यांचे जाळे उभारणेबाबत तसेच मुंबई –गोवा महामार्गाला ‘स्वराज्य भूमी कोकण महामार्ग ’ हे नाव देण्याची मागणी एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हाजी शाहनवाझ खान यांनी एका लेखी निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
विदर्भाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या समृध्दी महामार्गाचे काम गतीमान पध्दतीने सुरू आहे. महाराष्ट्राचा विकास झालाच पाहिजे. कोठेही विकासामध्ये महाराष्ट्र मागे पडू नये अशीच कोकणवासियांची भूमिका आहे. तथापि महाराष्ट्राचा विकास होत असताना ही विकासगगंगा कोकणातही आली पाहिजे. कोकणच्या विकासाला हातभार लावू पाहणाऱ्या योजनांना राज्य व केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. निधीची कमतरता भासणार नाही याकडेही प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही भागात विकास होण्यापुर्वी, तेथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी, कंपन्या-कारखाने सुरू होण्यासाठी, पर्यटक येण्यासाठी त्या त्या भागातील रस्ते सुसज्ज पाहजे. ये-जा करणाऱ्या वाहनांची कोठेही गैरसोय झाली नाही पाहिजे, हे सर्वप्रथम सूत्र अंगिकारले जाते. पण कोकणच्या बाबतीत विकासाचा पहिला टप्पा असणाऱ्या पायाभूत सुविधांचा एक भाग म्हणून सुसज्ज रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात राज्य व केंद्र सरकारने सातत्याने उदासिनता दाखविली आहे. त्यामुळे विकासाबाबत केवळ वल्गनचा होत आहे. कार्यवाही होत नाही, हीच कोकणवासियांची खंत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे. या महामार्गाच्या पूर्ततेसाठी कोकणवासियांनी अजून किती काळ प्रतिक्षा करायची? दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात जाताना कोकणवासियांना खड्डेमय रस्त्यातूनच ये-जा करावी लागत आहे. साधे रस्तेही कोकणवासियांना उपलब्ध करून दिले जात नाही. विकासासाठी रस्ते चांगले असल्यास इतर भागाशी संपर्क येतो. कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या सह्याद्री महामार्ग कोकणला जोडण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक हे कोकणचे सुपुत्र आहे. स्वराज्य निर्मिती करताना शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात वास्तव्य करताना कोकणचे महत्व महाराष्ट्राला अधोरेखित केले आहे. त्यामुळे या मुंबई गोवा महामार्गाला कोणत्याही राजकीय घटकाचे नाव न देता, कोणताही राजकीय वादंग निर्माण न करता ‘स्वराज्य भूमी कोकण महामार्ग ’ हे नाव देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यास, सह्याद्री मार्ग कोकणला जोडल्यास दळणवळणाची साधने उपलब्ध होतील, हजारो कोटीची उलाढाल होईल. कंपन्या-कारखाने येथे सुरू होतील. कोकणच्या माणसांना कोकणातच रोजगार उपलब्ध होतील. यातून राज्य सरकारलाही कोट्यवधी रूपयांचा महसूल उपलब्ध होईल. विकासामुळे कोकणचा चेहरामोहरा बदलला जाईल. यासाठी राज्य व केंद्र सरकारची इच्छाशक्ती आवश्यक आहे. मुंबई-गोवा महामार्गाला निधी उपलब्ध करून देताना लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा. सह्याद्री मार्ग कोकणला जोडावा, हीच कोकणवासियांची मागणी आहे. कोकणच्या विकासाबाबत लवकरच आम्ही एमआयएमच्या वतीने आपली व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार आहोत.
कोकणच्या विकासाबाबत रस्त्याचे जाळे निर्माण करताना राज्य व केंद्राने उदासिनता दाखविल्यास एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्राच्या व राज्याच्या मंत्र्यांना कोकणात फिरू देणार नाहीत, त्यांची वाहने अडविले जातील, कार्यक्रमस्थळी निषेधात्मक आंदोलने केली जातील याची राज्य सरकारने नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनातून हाजी शाहनवाझ खान यांनी सरकारला दिला आहे.
कोकणचा विकास व्हावा, कोकणवासियांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, येथे अर्थकारणाचा सुकाळ व्हावा हीच कोकणवासियांची मागणी आहे. आपणही राज्य सरकारच्या माध्यमातून यावर सकारात्मक भूमिका घेवून कोकणात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, निधी वेळोवेळी उपलब्ध करून द्यावा. केंद्राकडे याकामी निधी मागावा अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.