मुंबई : अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारकडून तातडीने ‘झेड’ प्लस सिक्युरिटी उपलब्ध करून देण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
राजधानी दिल्ली. आपल्या देशातील महत्वाचा भाग. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा खासदारांह अन्य महत्वाच्या राजकीय व प्रशासकीय घटकांची चर्दळ असलेला भाग. मंगळवारी राजधानी दिल्लीत अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची समाजविघातक शक्तींकडून व अपप्रवृत्तींकडून तोडफोड करण्यात आली. त्याचा निषेध करून देशाच्या राजधानीत अशी घटना घडल्याने तेथील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची चिंता हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
देशातील खासदार व जनाधार असलेल्या नेतृत्वाचे निवासस्थानच राजधानी दिल्लीत सुरक्षित नसेल तर तिथे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची सुरक्षा यावरही प्रश्नचिन्ह आहे. अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे देशातील लाखो लोकांचे श्रध्दास्थान आहे. एका वैचारिक नेत्याच्या निवासस्थानी झालेला घाला हा विचार स्वातंत्र्यांवर, वैचारिक चळवळीवर घाला आहे. ओवेसी यांच्या जीवाला धोका असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या जिविताची काळजी घेणे आता केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेतून बोध घेवून केंद्र सरकारने ओवेसी यांना तातडीने झेड प्लस सिक्युरिटी उपलब्ध करून देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.