नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षे झाले लांबणीवर पडलेली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये ही निवडणूक होण्याचे संकेत राजकीय घटकांना प्राप्त झाले आल्याने निवडणूकीची तयारी प्रस्थापितांकडून तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांकडून सुरू झालेली आहे. तथापि निवडणूका पॅनल पध्दतीने होणार असल्यामुळे सर्वाचाच हिरमोड झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका तीन सदस्यीय पॅनल पध्दतीने होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत असल्याने सत्ताधारी पक्षाने विशेषत: शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा पॅनल पध्दतीचा निर्णय घेतलेला आहे. या पॅनल पध्दतीच्या निर्णयाचा कॉंग्रेसला काहीही फायदा होणार नाही, उलट झाले तर या निर्णयाने कॉंग्रेसचे राजकीय नुकसानच होणार आहे. आधीच मागील काही काळापूर्वी झालेल्या यापूर्वीच्या पॅनल पध्दतीच्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेसचे संख्याबळ घटलेले आहे. नवी मुंबईतील महापालिका निवडणूकांवर नजर मारावयाची झाल्यास भाजपाला व त्याखालोखाल शिवसेनेलाच पॅनल पध्दतीचा फायदा होणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला काडीमात्र फायदा होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस यापूर्वी सत्तेत असली तरी गणेश नाईक भाजपात जाताच राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे महापालिकेतील संख्याबळ एकआकडीवर आले आहे. तीच गोष्ट कॉंग्रेसची आहे. वाशी गावातील खाडीपुलापासून सानपाडा-पामबीच मार्गे जुईनगरपर्यत विस्तारलेले नेतृत्व दशरथ भगत भाजपात येताच कॉंग्रेसचे संख्याबळही एकआकडीवर आलेले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिका निवडणूकीत दुहेरी संख्याबळही गाठता येणे अवघड आहे. महापालिका निवडणूकीत खरी लढत ही भाजपा व शिवसेनेतच होणार आहे. भाजपा आणि शिवसेनेकडे पालिका निवडंणूक लढविण्यासाठी प्रभागाप्रभागात मातब्बर चेहरे आहेत. या चेहऱ्यांचा शेजारच्या दोन-तीन प्रभागातही परिचय आहे. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काय? त्यांना घडलेल्या राजकीय फाटाफूटीमुळे नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गावडे पितापुत्री, काल परवा शिवसेनेतून नव्याने आलेले नामदेव भगत,सानपाड्यात दिलीप बोऱ्हाडे, दारावेत संदीप सुतार व घणसोलीत माथाडींचे श्रध्दास्थान असलेल्या अण्णासाहेब पाटील यांच्या नावावर व माथाडी कामगारांच्या मतांवर एकादा प्रभाग, दिघ्यातील एकादा प्रभाग हे सोडले तर कोणत्या ५-१० प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून येतील, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील रथी-महारथीही सांगू शकणार नाहीत. कॉंग्रेसचेही तेच चित्र आहे. मिरा पाटील, पूनम पाटील, अंकुश सोनावणे, अविनाश लाड, रमाकांत म्हात्रे याशिवाय कॉंग्रेसची गाडी पुढे सरकणार किती? त्यातच पॅनल झाल्यावर, तीन प्रभागातून मतदान घ्यावयाचे झाल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील मातब्बरांवरही घरी बसण्याची वेळ येणार आहे. भाजप व शिवसेनेकडे उमेदवारांचा दुष्काळ नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रसेकडे १११ मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारही नाहीत. कॉंग्रेसने पॅनल पध्दतीला कडाडून विरोध केला आहे. एकतर पॅनल पध्दती रद्द करावी अथवा त्रिसदस्यीय पॅनल पध्दती न ठेवता केवळ दोन वॉर्डापुरतीच पॅनल पध्दती सिमित ठेवण्याचे प्रयत्न कॉंग्रेस पक्षाकडून सुरू झाले आहेत. मुळातच भाजप-शिवसेनेसारख्या मातब्बर प्रस्थापितांनाही पॅनल पध्दती नको आहे. जे काही होईल, ते आपल्या वॉर्डात होईल. आपल्या वॉर्डातून आपण कसेही मतदान खेचू, पण दुसऱ्या प्रभागातील मतदानाचे काय? तो उमेदवार तितका सक्षम नसेल, खर्च करण्याइतपत ताकदवर नसेल तर काय? तोही पडेल, पण सोबत आपल्यालाही घेवून पडेल असा सूर आता वार्डावार्डातून निवडणूक लढवू पाहणाऱ्या घटकांकडून आळविला जात आहे. पॅनल पध्दतीमुळे निवडणूक लढवू पाहणाऱ्या हवशा-नवशा-गवशांचा मात्र हिरमोड होणार आहे. स्वत:च्याच वार्डातून येण्याची खात्री नसताना तीन प्रभागातून कोठे मतदान खेचायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. केवळ वार्डात उभे राहायचे, निवडणूक लागण्यापूर्वी सोशल मिडियात गाजावाजा करून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही ‘तोडपाणी’ होते का, असा बऱ्याच घटकांचा हिशोब असतात, त्यादृष्टीने त्यांनी गणितेही आखलेली असतात. पण त्याही मनसुब्यावर पॅनल पध्दतीमुळे पाणी पडले आहे. एकंदरीत पॅनल पध्दती कोणालाच नको आहे. लागू झाली तर भाजपा व शिवसेनेचाच फायदा होणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काय? त्यांची आजची राजकीय ताकद पाहता जागावाटपात त्यांच्या पदरी फारशा जागाही पडण्याची शक्यता नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला पालिका निवडणूकीत मिळणाऱ्या जागा या शिवसेनेला बोनसच ठरणार आहेत. सत्तासंपादन करताना कमी पडणाऱ्या जागांची कुमक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिळेल. मतविभागणी होणार नाही. पॅनल पध्दती रद्द करण्यासाठी अथवा दोन सदस्यीय ठेवण्यासाठी कॉंग्रेस धावपळ करत आहे. पॅनल पध्दती रद्द होणे शक्य नाही. त्यामुळे पॅनल पध्दती उमेदवारांना नको असली तरी त्यांना पॅनल पध्दतीतून निवडणूका लढवाव्या लागणार आहेत. पॅनल पध्दतीमुळे बाजूच्या वार्डातील आपल्या पक्षातील माणसांबरोबर वाद असले तरी आता जुळवून घ्यावे लागणार आहे. गळ्यात गळे घालून दोस्तीचे गाणे आळवावे लागणार आहे.
- सौ. सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील
- संपादक : नवी मुंबई लाईव्ह.कॉम
- संपर्क : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
- मेलआयडी :- Navimumbailive.com@gmail.com