स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित होण्याकरिता लस उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केले जात आहे. या अनुषंगाने उद्या गुरूवार, दि. ३० सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या १०० लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील नागरिकांकरिता कोव्हिशील्डच्या पहिल्या डोसचे नियोजन जाहीर करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत १० लाख ४१ हजार ०३ नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून ५ लाख ७ हजार ७१९ नागरिकांनी कोव्हीडचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
कोव्हीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी अधिकाधिक नागरिक लसीकरणाद्वारे संरक्षित व्हावेत हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. यादृष्टीने नागरिकांना आपल्या घरापासून जवळ लस घेणे सोयीचे व्हावे व एका ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता उद्या ३० सप्टेंबरला १०० केंद्रे कार्यान्वित असणार आहेत व २६२५० लस उपलब्ध आहेत.
यामध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली, तुर्भे रूग्णालये तसेच सेक्टर ५ वाशी येथील इ.एस.आय.एस. रूग्णालयात ४ केंद्रे असलेली व विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे २ केंद्रे असलेली जम्बो सेंटर्स, २३ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे, एपीएमसी येथील ग्रोमा सेंटर दाणा मार्केट व भाजी मार्केट, रेल्वे कॉलनी हेल्थ युनीट जुईनगर त्याचप्रमाणे इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅंड सेंट्रल मॉल सीवूड येथील ड्राईव्ह इन लसीकरण याठिकाणी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण होणार आहे.
यासोबतच बेलापूर विभागात ८, नेरूळ विभागात १२, वाशी विभागात ४, तुर्भे विभागात ६, कोपरखैरणे विभागात १०, घणसोली विभागात १०, ऐरोली विभागात ८ व दिघा विभागात ३ अशी ६१ वेगळी केंद्रे शाळा, समाजमंदिर, सांस्कृतिक भवन अशा ठिकाणी कार्यान्वित असणार आहेत.
याशिवाय सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता कोव्हिशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी 9 ते 5 या वेळेत विशेष केंद्रावर उपलब्ध असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने लस उपलब्धतेनुसार दररोज ५० हजारपेक्षा अधिक लसीकरणासाठी ११० केंद्रांचे नियोजन केलेले आहे तरी नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यंत सुरक्षित असलेली कोव्हीड लस घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.