टिळक भवन येथे जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन
स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात एका छताखाली आणले. बापूच्या एका हाकेवर देश एकत्र होत असे. त्यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावला. गांधी विचाराने देशाला नाहीतर जगाला दिशा दिली. पण ज्या विचाराने महात्मा गांधी यांची हत्या केली तेच लोक आज गांधी जयंतीनिमित्त गांधी विचार सामान्यापर्यंत पोहचवत आहेत, हीच गांधी नावाची ताकद आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त टिळक भवन या पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले, त्यानंतर पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वातंत्र्याचा लढा दिला. भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते आज देशातील लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणत आहे. ज्या विचाराच्या लोकांनी महात्मा गांधी यांची हत्या केली तेच लोक आज गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेऊन गांधी विचार सामन्यापर्यंत पोहचवणार असे सांगत आहेत. त्या लोकांकडे सांगण्यासारखे, आदर्श घेण्यासारखे काहीच नाही. म्हणून ते कधी सरदार पटेल तर कधी महात्मा गांधी यांचा आश्रय घेतात. देशातील जनता या लोकांचं ढोंग ओळखून आहे. त्यांनी गांधी प्रेमाचा कितीही आव आणला तरी त्यांचे खरे रूप लोकांना माहित आहे. गांधी हत्येनंतर मिठाई वाटणाऱ्या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो ही बापूची व त्यांच्या विचाराची ताकद आहे. पण बापूने घालून दिलेल्या मार्गाने वाटचाल करणे त्यांना जमणारे नाही.
माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला परंतु आज भाजपाच्या राजवटीत चुकीच्या धोरणामुळे जवानांना सीमेवर बलिदान द्यावे लागत आहे. चीनी आक्रमण थोपवण्यात मोदी सरकार फेल ठरले आहे तर शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सरचिटणीस देवानंद पवार, राजेश शर्मा, हकीम मुनाफ, भावना जैन, ब्रिजकिशोर दत्त, सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, विश्वजीत हाप्पे, डॉ. गजानन देसाई, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.