नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ मधील छत्रपती संभाजी राजे उद्यानातील शौचालयाची दुरावस्था दूर करण्याची लेखी मागणी जनसेवक गणेश भगत यांनी नेरूळ पालिका विभाग अधिकाऱ्यांकडे तर माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ मध्ये महापालिकेचे छत्रपती संभाजी राजे उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाचे सार्वजनिक शौचालय आहे.
पालिका प्रशासनाचा संबंधित विभाग शौचालयातील सुविधांकडे कानाडोळा करत असल्याने शौचालयाला दुरावस्था आली आहे. शौचालयात फ्लोवर टाइल तुटल्या आहेत, दरवाज्याला कडी नसून तो व्यवस्थित बंद होत नाही. लाईट बंद चालू होत असते. पाणी ओव्हर फ्लो होवून वाहत असते. यामुळे शौचालय परिसराला बकालपणा आला असून उद्यानात येणाऱ्या रहीवाशांचीही गैरसोय होत आहे. निवेदनासोबत फोटोही सादर करत आहेत. संबंधितांना या सार्वजनिक शौचालयातील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत आणि माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केली आहे.