स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम विविध राजकीय संघटनांकडून नवी मुंबई शहरात राबविले जात असतात. भाजपाकडून ८५-८६ मध्ये साजरा होत असलेल्या नवरात्र उत्सवामध्ये विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या सहवासात भक्तिमय वातावरणात तल्लिन होताना कोरोना महामारीचे भान ठेवून कर्म आणि भक्तिचा मिलाफ घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका, प्रभाग ८५च्या मा. नगरसेविका आणि महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.
नेरूळ सेक्टर ६ मधील तानाजी मालुसरे मैदानात २०१५ पासून समृध्दी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भाजपा युवा नेते सुरज पाटील, प्रभाग ८५च्या मा. नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि प्रभाग ८६च्या मा. नगरसेविका सौ,. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी व शासकीय निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन या नवरात्र उत्सवात दि. ७ ऑक्टोबर ते दि. १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मूहूर्तावर दुर्गामातेचे आगमन झाल्यावर दुपारी १२ ते २ या वेळेत डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांबाबत मार्गदर्शनपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता कोव्हिड योध्द्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ ते ७.३० या वेळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ ते ७.३० या वेळेत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ५ वाजता महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ५ वाजता देवीची उत्तरपूजा व त्यानंतर विसर्जन सोहळा होणार आहे. या उत्सवात दररोज दुपारी १२ वाजता दुर्गामातेची आरती होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व भाजपाचे युवा नेते सुरज बाळाराम पाटील यांनी दिली.
लस घ्या, नियम पाळा, कोरोनाला दूर पळवा असा संदेश देत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका व स्थानिक मा. नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी दिली.