स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६ – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडविण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागामध्ये बहूउद्देशीय कामगार संवर्ग पध्दतीवर सुरक्षा रक्षक काम करत आहेत. या सुरक्षा रक्षकांचे कंत्राटदारांकडून शोषण होत असल्याने व सातत्याने गेल्या काही वर्षापासून अन्यायच होत असल्याने या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
अनेक वर्षे काम करूनही ठेकेदारांकडून संबंधित सुरक्षा रक्षकांना वेतनाची पावती दिली जात नाही. तसेच पीएफ कापला जात आहे अथवा याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना काहीही माहिती नाही. वेतन पावतीच भेटत नसल्याने आपणास नक्की वेतन किती आहे याचीही कामगारांना माहिती नाही. तसेच या कामगारांचा एरियसही गेल्या अनेक वर्षापासून थकलेला आहे. संबंधित ठेकेदारांकडून या कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषणच केले जात आहे. कामगारांना वेतनाची व पीफची पावती मिळावी, थकीत एरियस तातडीने मिळावा, ईएसआयच्या माध्यमातून हक्काची सुविधा उपलब्ध व्हावी. कामगारांचे शोषषण करणाऱ्या व त्यांना सातत्याने असुविधांच्या व समस्यांच्या विळख्यात ठेवणाऱ्या ठेकेदाराची चौकशी होणे आवश्यक आहे. कामगारांचे वेतन पालिका देत असताना ठेकेदारांना कामगारांचे शोषण करण्याचा काहीही अधिकार नाही. आपण या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दंडीत करावे. शिक्षण विभागातील सुरक्षा रक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केली आहे.
नवी मुंबई : : महापालिका आस्थापनेत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना तसेच परिवहन विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ४० हजार रूपये सानुग्रह अनुदान (दिपावली बोनस) देण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सध्या महागाईचा उद्रेक झालेला आपणास माहिती आहेच. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वत:च्या व स्वत:च्या परिवाराची काळजी न करता नवी मुंबईकरांसाठी सेवा बजावलेली आहे. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनीही नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावलेली आहे. बससेवेत खंड कोठेही पडला नाही. कोरोना काळात प्रवासासाठी नवीमुंबईकरांची कोठेही गैरसोय झालेली नाही. आपल्या महापालिकेची राज्यात श्रीमंत महापालिका अशी प्रतिमा आहे. अडीच हजार कोटींच्या एफडी महापालिकेच्या आहेत. कामगारांनी केलेली उल्लेखनीय सेवा पाहता दिपावलीच्या पार्श्वभूमीवर या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तसेच परिवहन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिपावलीच्या पार्श्वभूमीवर ४० हजार रूपये सानुग्रह अनुदान (दिपावली बोनस) जाहिर करावे व लवकरात लवकर त्यांना देण्यात यावे अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.