स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : खाडीकिनारी झाडांवर विसेषत: खारफुटीच्या फांद्यावर बसणारे किडे, चिलटे यांच्या शौचामुळे कोणाचे लाखो रूपयांचे नुकसान होईल, यावर कोणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. पण खाडीअंर्तगत भागात आगारामध्ये असणाऱ्या खारफुटीवरील किड्यांच्या शौचामुळे सारसोळे कोळी समाजातील मच्छिमारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून आगरात पाळलेले मासे मोठ्या संख्येने मृत होवून पाण्यावर तरंगत असल्याचे शनिवारी सकाळी दुर्दैवाने या मच्छिमारांना पहावयास मिळाले.
खाडीमध्ये दूषित व रासायनिक पाणी येवू लागल्याने खाडीतील मासेमारीवर विपरीत परिणाम होवून मासेमारी व्यवसायाला अखेरची घरघर लागलेली आहे. त्यातच खाडीमध्ये उभारले जाणारे वाशी-मानखुर्दमधील पुलांमुळे मासेमारी संपुष्ठात येण्याला मदतच प्राप्त झाली आहे. त्यातच शिवडी-न्हावाशेवादरम्यान उभारल्या जाणाऱ्या पुलामुळे नवी मुंबईतील मासेमारी करणाऱ्यांपुढे येत्या काळात उपजिविकेचा गंभीर प्रश्नच निर्माण होणार आहे.
खाडीत मासेमारी कमी होवू लागल्यावर नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाने खाडीअंर्तगत भागात आपला मत्स्य शेतीचा पारंपारिक व पिढ्या न पिढ्या जोपासल्या गेलेल्या व्यवसायाकडे पुन्हा एकवार लक्ष केंद्रीत केले. आगार म्हणजे खाडीअंर्तगत भागात पूर्वीपासून असणाऱे लहान-मोठ्या स्वरूपातील खड्डे होय. या खड्ड्यांमध्ये माशांचे लहान बीज सोडणे व तीन-चार महिने त्यांचे संगोपन करून ते मासे मोठे झाल्यावर विक्री करणे हा खाडीअंर्तगत भागातील आगरामध्ये मच्छिमार लोकांनी पारंपारिक पिढ्या न पिढ्या जोपासलेल्या प्रकारावर पुन्हा मेहनत घेण्यास सुरूवात केली आहे. भरतीच्या वेळी खाडीतील पाणी आगारात घेणे, ज्यायोगे माशांनाही ताजे पाणी उपलब्ध होते. खाडीच्या पाण्यामध्ये अनेकदा आगारात कचराही मोठ्या प्रमाणावर येतो. आगारात उतरून हा कचरा हाताने साफ करावा लागतो. भरतीच्या पाण्याबरोबर गाळही या आगारात येत असतो. त्यामुळे अनेकदा उन्हाळ्यात कोळी समाज आपल्या परिवारासमवेत या आगारात उतरून श्रमदानाने माती काढत असतो. खाडीभागात जेसीपी नेण्यास बंदी असल्याने मच्छिमार बांधव आपल्या बायका-मुलांसह आगरातील गाळाची माती दोन ते तीन महिने दिवसभर काढत असतो. ही गाळाची माती न काढल्यास आगारातील मत्स्यपालनाचा प्रकारही संपुष्ठात येईल व मासेमारी प्रकारावर अवलंबून असणाऱ्या या आगरी-कोळी समाजावर उपासमारीची वेळ येईल.
या आगारासभोवताली तसेच आगारामध्ये आपणास खारफुटी विस्तारलेली पहावयास मिळते. या खारफुटीमध्ये खाडीतील कचरा, थर्माकोल, पायातील चपला-बूट व अन्य साहीत्य साचलेले पहावयास मिळते. या खारफुटीवर विशिष्ठ प्रकारचे किडे आपणास दिसतात. हे किडे चावा घेतात. किड्यांनी आपल्या शरीरावर चावा घेतल्यास खाज सुटून मरणप्राय यातना होत असतात. या किड्यांचे शौच त्या आगारातील पाण्यात पडल्यास पाणी काळे पडून आगारातील मासे मरतात व पाण्यावर तरंगताना मृत मासे पहावयास मिळतात. आगारासभोवताली जरी या किड्यांचे शौच पडल्यास भरतीच्या वेळी पाणी घेताना आगाराशेजारील मातीवर पडलेले शौच आगारातील पाण्यात विलीन होवून पाणी काळे पडते व मासे मरतात. दुर्दैवाने तोच प्रकार सारसोळेच्या खाडीत आगारात मत्स्यपालन करणाऱ्या कोळी लोकांच्या बाबतीत घडला आहे. या किड्यांच्या शौचामुळे पाच-सहा कोळी लोकांच्या आगारातील मासे मोठ्या संख्येने मृत होवून पाण्यावर तरंगताना पहावयास मिळाले. या प्रकाराने सारसोळेच्या आगाराशी संबंधित कोळी लोकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.