बळीराजाच्या घरीही दिवाळी साजरी होवू दे!
दिवाळीनिमित्त सर्व जग रोषणाईंने उजळून निघत आहे. पणत्या, आकाशकंदील, विविध दिव्यांनी घराजवळचा, कार्यालयाजवळचा परिसर लख्ख प्रकाशात न्हावून निघाला आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये उडणाऱ्या पावसाचे फवारे, सुरसुरीचा आनंद, भुईचक्राची मज्जा, घरात विविध पदार्थांचा फराळ यामुळे घराघरात दिवाळीची लज्जत वाढीस लागली आहे. पण आपल्या घरासाठी भाज्या-धान्य पिकविणाऱ्या बळीराजाच्या घरामध्ये दिवाळीचा प्रकाश मंद तेवत आहे. चेहऱ्यावर उसने हासू आणत आपल्या अन्नाची, भाज्यांची, फळांची काळजी घेणारा बळीराजा समाजामध्ये वावऱत आहे. समाजामध्ये अनेक घटक दिवाळीनिमित्त नवनवीन कपडे घालून मिरवत असताना आपला बळीराजा मात्र अंगावरील कपड्यांची ठिगळे लपविण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी एक प्रश्न निर्माण होतो, जगाची भूक भागविण्यासाठी अहोरात्र आपल्या बायकां-मुलांसह काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाला व त्याच्या परिवाराला दिवाळी साजरा करण्याचा खरोखरीच हक्क नाही का? त्यांच्या आयुष्यात दिवाळी पहाट कधी उजाडणार, इतरांच्या पोटपूजेची दिवाळी साजऱ्या करणाऱ्या अन्नदात्याला आयुष्यभराचे मातेरे करून होळीतच स्वत:ची आहूती देण्याचा कुटील डाव नियतीने तर रचलेला नाही ना? हे चित्र बदलणार कधी, या प्रश्नांचे ठोस उत्तर विश्वनिर्मात्या ब्रम्हदेवाला व त्याचे सहकारी असणाऱ्या ३३ कोटी देवांनाही कदाचित देता येणार नाही.
ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ या दुष्टचक्रातच बळीराजाचे जीवन अडकले आहे. कधी या संकटातून सुटका झालीच तर बाजारभाव पडलेले, पिक काढण्यासाठी झालेल्या खर्चाचीही गुंतवणूक निघणे शक्य होत नाही. चुकून जर कशी कांद्यांनी पन्नाशी-शंभरी गाठलीच तर सर्वसामान्यांपासून मिडिया तसेच सोशल मिडियावरील तथाकथित विचारवंत आपल्या अकलेचे तारे तोडत टाहो फोडताना पहावयास मिळतात. पण कांदा जरी भावात पन्नाशी-शंभरी उलटली तरी तो पिकविणाऱ्या बळीराजाच्या हातात किलोमागे वीस ते पंचवीस रूपये तरी भेटतात का, याचा विचार कोणत्या शहाण्याला करावासा वाटत नाही. आयुष्याचा जुगार करून शेतीसाठी जीवन समर्पित करणारा आपला बळीराजा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. यंदा तर ग्रामीण भागात सर्वत्र अतिवृष्टीने कहर केलेला आहे. वरूणराजाच्या अतिप्रेमाने शेतातील उभ्या पिकांचे वाटोळे झाले आहे. मुसळधार पाऊसामुळे शेतातच पाणी साचलेले तुम्हा-आम्हाला पहावयास मिळाले, पण उभ्या पिकांची नासाडी झाल्यावर बळीराजा व त्याच्या परिवाराच्या डोळ्यात निर्माण झालेला अश्रूंचा महापुर मात्र कोणाला दिसलाच नाही आणि जाणून घेण्याचीही कोणी तसदीच घेतली नाही. शेती नावाचा बेभरवशाच्या प्रकारावर तो आपली व आपल्या परिवाराची उपजिविका भागवित आहे. तुमचे-आमचे पोट भरणारा बळीराजा धान्य, भाजीपाला, फळे पिकविण्यासाठी स्वत: मात्र कर्जबाजारी होत चालला आहे. चुकून-माकून कोणत्या सरकारने कर्जमाफी केल्यावर अनेकांच्या पोटामध्ये पोटदु:खी सुरू होते. बळीराजा कर्जबाजारी झालाय तो स्वत:ची ऐषोआरामी करण्यासाठी नाही तर तुमच्या आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कर्जबाजारी झाला आहे, याचे भानही बळीराजाबाबत बोलताना एकदा नव्हे तर शतदा ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न जे करमुक्त असल्याचा टाहो अनेक बुध्दीजिवींकडून फोडला जात आहे. उत्पन्न असेल तरच कर लावला जाईल ना. एका पिकात उत्पन्न मिळाल्यावर पुढची दहा उत्पन्न काढण्यात कर्जबाजारी झालेला हा बळीराजा या बुध्दीवंतांना दिसत नाही आणि दिसणारही नाही. कारण डोळ्यावर झापडे लावून बुध्दीजिविचे लेबल लावून आयुष्यभर बळीराजाप्रती गांधारीची भूमिका घेणाऱ्या या बुध्दीजिवींना उघडे करून शंभर आसूडाचे फटके त्यांच्या शरीरावर भर चौकात लगावले पाहिजे. शहरी भागात २० ते ३० हजार रूपये मासिक उत्पन्न कमविणारा नोकरदार माणूसही आपल्या उत्पनात कुटूंबाची उपजिविका भागवून घर, एकादे दुकान व थोडीफार बचत करतो. पण आयुष्यभर शेती करणारा बळीराजा कमवितो तरी काय? अंगावर फाटकी कपडे आणि शेतावर काढलेले कर्ज हीच त्याची आयुष्यभराची पुंजी असते. त्यामुळे बळीराजाला मदत कऱता आली नाही तर एकवेळ करू नका. पण बळीराजाबाबत अपप्रचार करून त्याची जनसामान्यात प्रतिमा मलीन करू नका. पिकांची नासाडी झाल्यावर सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असते. अतिवृष्टी झाल्यावर शेतातील पाणी व डोळ्यातील पाणी हटविण्यासाठी बळीराजाची मदत करायला तुम्ही-आम्ही पुढाकार घेत नाही.आपण महिनाभर काम केल्यावर किमान ठराविक उत्पन्न तरी मिळते. पण आयुष्यभर शेतीतच राबणाऱ्या बळीराजाचे उत्पन्न तरी काय? मुलीच्या लग्नासाठी शेतही गहाण ठेवावे लागते, नातेवाईकांकडून उधारउसनवार घ्यावी लागते. आता तरी विचार बदला, मानसिकता बदला. वृक्षसंवर्धन, पर्यावरण संतुलनासोबत बळीराजाचेही अस्तितत्व टिकविण्यासाठी पुढाकार घेवू याऽऽ चळवळ उभी करू याऽऽ. कारण बळीराजा नावाची जमातच संपली तर तुम्हा-आम्हाला भुकमारीने मरण्याची वेळ येईल. त्यामुळे किमान आपल्या स्वार्थासाठी, आपल्या अस्तित्वाच्या काळजीपोटी बळीराजाला मदत करू याऽऽ त्याच्याही घरी दिवाळी साजरी होईल, यासाठी प्रयत्न करू याऽऽ
– संदीप खांडगेपाटील
– Sandeepkhandgepatil@gmail.com
साभार : दै. नवराष्ट्र